Kalyan-Dombivali Crime : कल्याण-डोंबिवलीत ज्येष्ठ महिला 'टार्गेट'; २४ तासांत चेन स्नॅचिंगच्या दोन घटनांमुळे खळबळ

Chain Snatching
Chain Snatching-AI Image(AI Photo)
Published on
Updated on

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली परिसरात ज्येष्ठ महिलांना लक्ष करून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्या आहेत. गेल्या २४ तासांत कल्याण आणि डोंबिवलीत चेन स्नॅचिंगच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या असून, यात ज्येष्ठ महिलांना लक्ष्य करण्यात आले आहे. या दोन्ही प्रकरणांत पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरांचा शोध सुरू केला आहे. महिलांनी गर्दीच्या ठिकाणी आणि एकटे प्रवास करताना सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

पहिली घटना: जिन्यात गाठून दीड लाखांची सोनसाखळी लांबवली

कल्याण पूर्वेतील मलंगगड रोडवरील जय मल्हार हॉटेलच्या मागे असलेल्या 'श्रीकृपा होम्स' इमारतीमध्ये शनिवारी रात्री ९.४० वाजण्याच्या सुमारास पहिली घटना घडली. कुमारी विश्वंभर (वय ६५) या ज्येष्ठ महिला रात्रीच्या वेळी आपल्या घराकडे जाण्यासाठी इमारतीचे जिने चढत होत्या. त्याच वेळी २५ ते ३० वयोगटातील एक अनोळखी तरुण तिथे आला. त्याने विश्वंभर यांना जिन्यात गाठून, त्यांच्या गळ्यातील १ लाख ५० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन जबरदस्तीने हिसकावून पोबारा केला.

या अचानक झालेल्या प्रकारामुळे घाबरलेल्या विश्वंभर यांनी घरी पोहोचून कुटुंबीयांना घडलेली हकीकत सांगितली. त्यानंतर तातडीने कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी 'भारतीय न्याय संहिता' (BNS) कलम ३०९ (४) अन्वये गुन्हा दाखल केला असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप भालेराव या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दुसरी घटना: रिक्षा प्रवासात लक्ष विचलित करून ५० हजारांची चोरी

दुसरी घटना शुक्रवारी दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पूर्वेतील रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या नाका नंबर १ रिक्षा स्टँडवर घडली. इंदुमती मधुकर किनकर (वय ७७) या ज्येष्ठ महिला रिक्षातून प्रवास करत होत्या. त्याच रिक्षात ४० ते ४५ वयोगटातील एक अनोळखी महिलाही प्रवास करत होती.

प्रवासादरम्यान या संशयित महिलेने आपल्या कडेवर असलेल्या बाळाला दुसऱ्या खांद्यावर घेण्याचा बहाणा केला. यादरम्यान तिने इंदुमती यांचे लक्ष विचलित केले आणि अत्यंत शिताफीने त्यांच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन चोरून ती पसार झाली. काही वेळाने हा प्रकार लक्षात आल्यानंतर इंदुमती यांनी रामनगर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. रामनगर पोलिसांनी याप्रकरणी फरार महिलेविरुद्ध 'भारतीय न्याय संहिता' कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक लक्ष्मण बोरा या घटनेचा तपास करत आहेत.

पोलिसांचे आवाहन

कल्याण-डोंबिवलीत वाढत्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना, विशेषतः ज्येष्ठ महिलांना एकटे फिरताना मौल्यवान दागिने सुरक्षित ठेवण्याचे आणि अनोळखी व्यक्तींपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news