

डोंबिवली : भटक्या कुत्र्याने चावा घेतल्यामुळे रेबीजचा संसर्ग होऊन एका ३० वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याण पूर्व भागात घडली आहे. कुत्रा चावल्यानंतर वेळीच उपचार न घेतल्याने या तरुणाचे मानसिक संतुलन बिघडले होते, ज्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून रेबीजच्या धोक्याबाबत भीतीचे वातावरण पसरले आहे.
कल्याण पूर्वेकडील तिसगाव नाका येथील सहजीवन सोसायटीत राहणारा आयश विश्वनाथ अमीन (वय ३०) याला काही दिवसांपूर्वी एका भटक्या कुत्र्याने चावा घेतला होता. कुत्र्याने त्याच्या पायाचा लचका तोडला होता. मात्र, आयशने या जखमेकडे गांभीर्याने पाहिले नाही. त्याने रेबीज प्रतिबंधक लसीकरणाचा संपूर्ण डोस न घेता केवळ एकच इंजेक्शन घेतले आणि पुढील उपचार अर्धवट सोडले.
गेल्या दोन-चार दिवसांपासून आयशच्या वागण्यात विचित्र बदल जाणवू लागले होते. त्याला हायड्रोफोबियाची (पाण्याची भीती) लक्षणे दिसू लागली होती. तसेच त्याच्या शारीरिक हालचालीही श्वानासारख्या होत होत्या. रेबीजचा संसर्ग मेंदूपर्यंत पोहोचल्याने त्याचे मानसिक संतुलन पूर्णपणे कोलमडले होते, असा प्राथमिक अंदाज वैद्यकीय सूत्रांनी वर्तवला आहे.
रविवारी (दि. २२) सायंकाळी घरी कोणीही नसताना आयशने गळफास लावून आत्महत्या केली. टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी त्याने एक 'सुसाईड नोट' लिहून ठेवली असून, त्यात आपल्या मृत्यूचे कारण स्पष्ट केले आहे. या घटनेची माहिती मिळताच कोळसेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
या घटनेनंतर कोळसेवाडी पोलीस अधिक तपास करत आहेत. भटक्या श्वानांचा वाढता वावर आणि रेबीजच्या लसीकरणाबाबत नागरिकांनी गाफील राहू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ‘कुत्रा चावल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन लसीकरणाचा संपूर्ण कोर्स पूर्ण करणे अनिवार्य आहे,’ असा सल्ला आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे.