Kalyan Crime : आधारवाडी कारागृहात शिपायावर दोन कैद्यांचा हल्ला; खडकपाडा पोलिसांत गुन्हा दाखल

Kalyan Crime : आधारवाडी कारागृहात शिपायावर दोन कैद्यांचा हल्ला; खडकपाडा पोलिसांत गुन्हा दाखल
Published on
Updated on

डोंबिवली : कल्याणच्या आधारवाडी कारागृहात दोन न्यायबंद्यांनी कारागृह शिपायाला धक्काबुक्की करत बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी कारागृह शिपाई राजू पोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खडकपाडा पोलिसांनी हल्लेखोर न्यायबंद्यांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीनुसार, कारागृह शिपाई राजू पोरे हे सोमवारी बंद्यांच्या नातेवाईकांशी होणाऱ्या 'ई-मुलाखत' कक्षात कर्तव्यावर होते. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यातील आरोपी विक्रम ऊर्फ विकी राजेंद्र कवठणकर आणि हितेश ऊर्फ मोगली कवठणकर हे दोघे सध्या आधारवाडी कारागृहात न्यायालयीन कोठडीत (न्यायाधीन बंदी) आहेत. या दोन्ही बंद्यांशी ई-मुलाखतीसाठी त्यांच्या नातेवाईकांनी केलेली ऑनलाइन विनंती (ई-रिक्वेस्ट) शिपाई राजू पोरे यांनी मंजूर केली होती. मात्र, काही तांत्रिक कारणास्तव ही मुलाखत कनेक्ट होऊ शकली नाही; त्यामुळे दोन्ही बंद्यांना मुलाखत कक्षाबाहेर थांबण्यास सांगण्यात आले होते.

मात्र, आदेश झुगारून दोघेही बंदी पुन्हा ई-मुलाखत कक्षात घुसले आणि तेथे ठेवलेला लॅपटॉप उचलण्याचा प्रयत्न करू लागले. या कृत्याला शिपाई राजू पोरे यांनी विरोध दर्शवला असता, विक्रम आणि हितेश यांनी त्यांच्या अंगावर धावून जात त्यांच्या गणवेशाची कॉलर पकडली आणि झटापट करत त्यांना उचलून आपटण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत शिपाई पोरे यांच्या खांद्याला दुखापत झाली. या प्रकारानंतर त्यांनी तातडीने वरिष्ठांना घटनेची माहिती दिली. वरिष्ठांच्या सूचनेनुसार शिपाई राजू पोरे यांच्या जबाबावरून खडकपाडा पोलीस ठाण्यात विक्रम ऊर्फ विकी कवठणकर आणि हितेश ऊर्फ मोगली कवठणकर या दोन्ही न्यायबंद्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news