

डोंबिवली : कल्याण पूर्वेतील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये दोन अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन केल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात एका ४७ वर्षीय सुरक्षारक्षकाविरोधात पॉक्सो (POCSO) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.
सुभाष वामन भिसे असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव असून, तो संबंधित सोसायटीमध्ये सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होता. सोसायटीच्या आवारातच त्याने दोन अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. हा प्रकार उघडकीस येताच पीडित मुलींच्या कुटुंबीयांनी तातडीने कोळसेवाडी पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपीविरोधात बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अर्थात ‘पॉक्सो’ कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. या घटनेमागील नेमका प्रकार काय आहे आणि यापूर्वीही असा काही प्रकार घडला होता का, याचा शोध पोलिस घेत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे संबंधित सोसायटीसह संपूर्ण परिसरात संतापाची लाट पसरली असून, सोसायट्यांमधील सुरक्षारक्षकांच्या पूर्वचारित्र्य पडताळणीचा (पोलीस व्हेरिफिकेशन) प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.