

डोंबिवली : कल्याण पूर्वेकडे पत्री पुलाजवळील कचोरे गावात चिखल आणि पाणी अंगावर उडाल्याचा साधा जाब विचारणे एका कुटुंबाला चांगलेच महागात पडले. किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या वादाचे पर्यवसान लाठ्या-काठ्यांनी झालेल्या तुफान मारहाणीत झाले. या हल्ल्यात एका वृद्ध महिला गंभीर जखमी झाल्या असून संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
कचोरे येथे राहणाऱ्या शेख आणि रेवडी या दोन कुटुंबांमध्ये हा वाद झाला. रविवारी दुपारच्या सुमारास शेकू रेवडी हा भरधाव वेगाने दुचाकी चालवत असताना रस्त्यावरील चिखल आणि पाणी शेख कुटुंबाच्या अंगावर उडाले. गाडी हळू चालवा, अशी साधी विनंती केल्याचा राग शेकूच्या मनात घर करून गेला.
काही वेळातच शेकू रेवडी याने आपल्या वडिलांसह इतर नातेवाईकांना घटनास्थळी बोलावून घेतले. त्यानंतर सर्वांनी मिळून हिना शेख, तिचे पती मुजम्मिल शेख आणि सासू जन्नत शेख यांच्यावर लाठ्या-काठ्यांनी अमानुष हल्ला केला. या हल्ल्यात जन्नत शेख या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर कल्याणच्या मीरा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर हिना आणि मुजम्मिल शेख यांनाही या हल्ल्यात किरकोळ दुखापत झाली आहे. विशेष म्हणजे ५० हजार रूपयांच्या आर्थिक व्यवहारावरून दोन्ही कुटुंबांमध्ये यापूर्वीही वाद झाला होता. तो वाद मिटला असला तरी जुना राग मनात ठेवून हा हल्ला केल्याचा आरोप जखमी कुटुंबाने केला आहे.
या घटनेची माहिती मिळताच टिळकनगर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जखमींच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.