

डोंबिवली : कल्याण पश्चिमेकडील गौरीपाडा परिसरात रविवारी रात्री कायद्याला आव्हान देणारी एक धक्कादायक घटना घडली. मद्याच्या धुंदीत असलेल्या एका तरुणाने तक्रारीवरून आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावरच काठीने हल्ला केला. या मारहाणीचा संपूर्ण थरार तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
खडकपाडा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले कर्मचारी गणेश चव्हाण रविवारी रात्री रहिवाशांच्या तक्रारीनंतर गौरीपाडा परिसरात गेले होते. राहुल तायडे नावाचा मद्यधुंद तरुण घराबाहेर उभा राहून आरडाओरडा करत असल्याची तक्रार होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते की, पोलीस कर्मचारी गणेश चव्हाण पायऱ्या चढून वर जात असतानाच आरोपी राहुल तायडे याने त्यांच्यावर अचानक काठीने वार करण्यास सुरुवात केली. चव्हाण यांनी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला, मात्र मद्यधुंद आरोपी त्यांच्यावर वारंवार हल्ला करत राहिला. काही क्षण दोघांमध्ये झटापटही झाली.
हल्ल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याने प्रसंगावधान राखत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि खडकपाडा पोलीस ठाण्याच्या पथकाला पाचारण केले. तातडीने घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी आरोपी राहुल तायडे याला ताब्यात घेतले. रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याच्याविरोधात शासकीय कामात अडथळा आणणे आणि सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर 'कायद्याच्या रक्षकावरच' असा उघड हल्ला झाल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास खडकपाडा पोलीस करत आहेत.