Kalyan Crime : मामाच्या घरी जात असलेल्या १४ वर्षीय मुलीवर रेल्वे यार्डात अत्याचार

लोहमार्ग पोलिसांची तत्परता, काही तासांत नराधमाला बेड्या
Kalyan Crime : मामाच्या घरी जात असलेल्या १४ वर्षीय मुलीवर रेल्वे यार्डात अत्याचार
Published on
Updated on

डोंबिवली : कल्याण रेल्वे जंक्शनसारख्या अत्यंत वर्दळीच्या आणि गजबजलेल्या ठिकाणी महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणणारी एक धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. मामाला भेटण्यासाठी अहिल्यानगरहून आलेल्या एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करत, निर्जन रेल्वे यार्डात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे. मात्र, पीडित मुलीने दाखवलेल्या धैर्यामुळे आणि लोहमार्ग पोलिसांच्या तत्परतेमुळे नराधम आरोपीला अवघ्या काही तासांतच गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे.

सौरभ संतोष सोनवणे (वय २३, रा. सिद्धार्थ नगर, कल्याण पूर्व) असे अटक करण्यात आलेल्या नराधम आरोपीचे नाव आहे. त्याला कल्याणच्या लोहमार्ग न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला अधिक चौकशीसाठी पोलिस कोठडी सुनावली आहे.

धमकी देऊन रेल्वे यार्डात नेले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ वर्षीय पीडित मुलगी अहिल्यानगरहून आपल्या मामाला भेटण्यासाठी निघाली होती. कल्याणवरून तिला खोपोलीला जाण्यासाठी लोकल पकडायची होती. ती कल्याण रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर लोकलची प्रतीक्षा करत थांबली असताना, तिथे दबा धरून बसलेल्या सौरभ सोनवणे या नराधमाची तिच्यावर वाईट नजर पडली. ओळख नसतानाही त्याने मुलीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला आणि अचानक तिचा मोबाईल हिसकावून घेतला.

या प्रकाराने मुलगी प्रचंड भयभीत झाली. तिने मोबाईल परत मागितला असता, "मोबाईल हवा असेल तर माझ्यासोबत पोलिस ठाण्यात यावे लागेल," अशी धमकी त्याने दिली. घाबरलेली मुलगी त्याच्यासोबत चालू लागली. मात्र, तिला पोलिस ठाण्यात नेण्याऐवजी आरोपीने तिला रेल्वे यार्डातील एका निर्जन ठिकाणी नेले आणि तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

पीडितेचे धैर्य आणि पोलिसांची वेगवान कारवाई

या भीषण प्रसंगातून पीडित मुलीने कशीबशी स्वतःची सुटका करून घेतली आणि थेट लोहमार्ग पोलिस ठाणे गाठले. घडलेल्या प्रकाराची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी मुलीला धीर दिला. वेळ न दवडता वपोनि कांदे यांनी तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आणि दुसरीकडे तपासाची चक्रे फिरवत विशेष पथक तैनात केले. पोलिसांनी रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली आणि अवघ्या काही तासांच्या आत नराधम सौरभ सोनवणे याला बेड्या ठोकल्या. पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, सध्या तिला समुपदेशन केले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news