

डोंबिवली : कल्याण पूर्वेतील लोकग्राम परिसरात बनावट सिमेंट तयार करून ते अंबुजा, अल्ट्राटेक सारख्या नामांकित सिमेंट कंपन्यांच्या गोण्यांमध्ये भरून विक्रीसाठी पाठविण्यात येत असल्याचा मोठा गोरखधंदा उघडकीस आला आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून चार ट्रक निकृष्ट दर्जाचे सिमेंट जप्त केले असून पंचनामा आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आहे. सदर अड्ड्यावर कमी प्रतीच्या सिमेंटला चाळण मारून ते नामांकित कंपन्यांच्या मूळ गोण्यांमध्ये सीलबंद करून विक्रीसाठी पाठवले जात होते. या बनावट सिमेंटचा वापर बांधकामांमध्ये झाल्यास इमारतींसह प्रकल्पांची गुणवत्ता धोक्यात येण्याची शक्यता असल्याने केलेल्या कारवाईवर जिल्हा प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे.
या संदर्भात पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, सदर ठिकाणाचे मालक नरेश मिश्र असून ही फॅक्टरी उल्हासनगरमधील नवीन भाटिया नामक व्यक्तीच्या नियंत्रणाखाली असल्याचे तेथील कामगारांनी पोलिसांना सांगितले. सदर अड्ड्यावरून लाखो रूपयांचे निकृष्ट दर्जाचे सिमेंट जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पर्दाफाश कल्याणातील जागरूक नागरिक पवन दुबे यांच्या सतर्कतेमुळे झाला आहे. या संदर्भात दुबे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, कल्याण पूर्वेकडील लोकग्राम परिसरात डुप्लिकेट सिमेंटचा साठा तयार करून ट्रकद्वारे विक्रीसाठी पाठवला जात असल्याची सकाळी फोनद्वारे माहिती देण्यात आली.
घटनास्थळी पोहोचलो असता सदर अड्ड्यावर १० ते १५ कामगार Not for Sale असे लिहिलेल्या अंबुजा आणि अल्ट्राटेक कंपनीच्या गोण्यांमध्ये सिमेंट भरताना आढळून आले. जाब विचारला असता त्यांनी उत्तर देण्यास इन्कार करून तेथून पळ काढला. त्यानंतर या प्रकाराची माहिती तात्काळ कोळसेवाडी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून चार ट्रक ताब्यात घेतले आणि चौकशी सुरू केल्याचे दुबे यांनी सांगितले.
कल्याण-शिळ महामार्गावर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम सुरू असतानाच रविवारी रात्री अचानक सोनारापाडा गावासमोरून जाणाऱ्या मेट्रोच्या एका खांबामधील लोखंडी सळ्या एका दिशेने झुकल्याच्या या प्रकाराची शासनाने गांभीर्याने दखल घ्यायला हवी. त्यातच कल्याणात भेसळयुक्त सिमेंटचे चार ट्रक जप्त होणे, हा प्रकार गंभीर आहे. परिणामी खासगी आणि सार्वजनिक बांधकाम उद्योगातील निकृष्ट साहित्याच्या वापराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित अशा प्रकारच्या बनावट उद्योगांसह असे रॅकेट चालविणाऱ्यांच्या मुळाशी जाऊन कारवाई करण्याच्या मागणीकडे लक्ष वेधताना माजी आमदार तथा मनसेचे नेते राजू पाटील यांनी चिंता व्यक्त केली आहे. राज्यात अनेक ठिकाणी सार्वजनिक प्रकल्पाच्या बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्यात अशा भेसळयुक्त सिमेंटचा वापर केला असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे भविष्यातील धोका ओळखून अशा प्रकल्पांसाठी वापरण्यात येणाऱ्या रेती, स्टीलसह सिमेंट सारख्या साहित्याची तांत्रिक तपासणी करायला हवीच, शिवाय या मागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता असल्याने मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश द्यावेत, याकडे राजू पाटील यांनी एक्स पोस्टद्वारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले आहे.