

डोंबिवली : पेस्ट कंट्रोलच्या नावाखाली लबाडी केल्याचा नमुना पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीतून समोर आला आहे. घरात वाढलेल्या झुरळे, पाली, किडा, मुंगी, वाळवीचा बंदोबस्त करण्यासाठी एकाला पेस्ट कंट्रोलच्या कामासाठी बोलविले. मात्र या बदमाशाने कुटुंबीयांची नजर चुकवून घरातील 87 हजार 500 रूपयांच्या ऐवजावर डल्ला मारला आहे. कल्याण पश्चिमेतील खडकपाडा परिसरात असलेल्या माधव संकल्प सोसायटीतील हरिहर इमारतीत राहणाऱ्या केवलरामानी कुटुंबियांच्या बाबतीत नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी घडला.
या संदर्भात सागर सुरेश केवलरामानी (32) यांनी खडकपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. बुधवारी दुपारी एकच्या सुमारास पेस्ट कंट्रोल करणारा कामगार केवलरामानी कुटुंबियांच्या घरी आला. या कामगाराने घरातील हॉल आणि किचननंतर बेडरूमचे पेस्ट कंट्रोल करायला घेतले. घरात कीटकनाशक फवारणीच्या वासाचा त्रास होऊ नये, यासाठी केवलरामानी कुटुंबीय दूर अंतरावर होते. ही संधी साधून कामगाराने तेथे असलेल्या चाव्यांच्या साह्याने बेडरूममधील कपाट उघडून तिजोरीतील 35 हजार रूपयांची रोकड आणि सोन्याच्या सात ग्रॅम वजनाचे दागिने असा एकूण 87 हजार 500 रूपये किंमतीचा सोन्याचा ऐवज पेस्ट कंट्रोल कामगाराने लबाडीने काढून घेतला. पेस्ट कंट्रोल झाल्यानंतर कुटुंबीयांनी कपाट तपासले तेव्हा त्यातील रोकड आणि सोन्याचा ऐवज नसल्याचे लक्षात आले. पेस्ट कंट्रोल करण्यासाठी आलेल्या कामगारानेच ही चोरी केली असल्याचा संशय व्यक्त करून सागर केवलरामानी यांनी खडकपाडा पोलिसांनी ठाण्यात तक्रार केली आहे.
घरात चोरी झाला नसताना, अन्य कोणी घरात आले नसताना रोख रक्कम आणि सोन्याचा ऐवज चोरीस गेल्याने पेस्ट कंट्रोल करण्यासाठी आलेल्या कामगारानेच ही चोरी केल्याचा कुटुंबीयांना संशय आहे. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक ए. एस. पवार अधिक तपास करत आहेत.
खडकपाडा पोलिसांनी पसार झालेल्या कामागाराचे नाव, पत्ता आणि संपर्क क्रमांक कुटुंबीयांकडून घेतला आहे. पोलिसांनी या माहितीनुसार आधारे फरार कामगाराचा शोध सुरू केला आहे. गेल्या महिन्यापासून डोंबिवलीत केबल चालक असल्याची थाप मारून घरातील किंमती ऐवज चोरून नेण्याच्या घटना वाढल्या आहेत. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, वृध्द आणि महिलांना लक्ष्य केले जात आहे. या प्रकारानंतर आता बदमाश मंडळी बहुरूप्यांची सोंगे घेऊन घरात चोऱ्या करू लागल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.