

डोंबिवली : कल्याण पश्चिमेकडे असलेल्या वर्दळीच्या आग्रा रोडवर मंगळवारी सकाळी दिवसाढवळ्या ४० लाख रुपयांच्या रोकडीची धाडसी लूट झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. भर रस्त्यात दुचाकीवरून बँकेत पैसे भरण्यासाठी जाणाऱ्या एका वृद्ध व्यापाऱ्याला चार लुटारूंनी लाथ मारून खाली पाडले आणि मारहाण करत त्याच्याकडील रोकड असलेली बॅग हिसकावून नेमप्लेट नसलेल्या दोन दुचाकींवरून पसार झाले. ही संपूर्ण थरारक घटना शू मॉल समोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून बाजारपेठ पोलिस फरार लुटारूंचा कसून शोध घेत आहेत.
या प्रकरणी मिळालेली माहिती अशी की, बिस्किट आणि सिगारेटचा व्यापार करणारे ६२ वर्षीय व्यापारी फारूख अख्तर हे मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे वालधुनी परिसरातून आपल्या एका सहकाऱ्यासोबत दुचाकीवरून बँकेत रोकड जमा करण्यासाठी निघाले होते. आग्रा रोडवरील शू मॉल समोर पोहोचताच मागून दोन दुचाकींवरून आलेल्या चौघांनी त्यांच्या दुचाकीला जोरात लाथ मारली.
अचानक झालेल्या हल्ल्याने व्यापारी आणि त्यांचे सहकारी दुचाकीसह रस्त्यावर कोसळले. खाली पडल्यानंतर दोघा बदमाशांनी वृद्ध व्यापारी फारूख अख्तर यांना जबर मारहाण करण्यास सुरुवात केली आणि त्यांच्या हातातील ४० लाख रुपये रोकड असलेली बॅग जबरदस्तीने हिसकावून घेतली. बॅग मिळताच चौघाही बदमाश्यांनी भरधाव वेगात घटनास्थळावरून पोबारा केला.
या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून त्यामध्ये लुटारू व्यापाऱ्याच्या दुचाकीला अडवत असल्याचे आणि लूट करून पळून जात असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. दोन्ही दुचाकींना नेमप्लेट नसल्याचे व्यापाऱ्याने पोलिसांना सांगितले. यावरून लुटारू सराईत असून ते तयारीनिशी आले होते हे स्पष्ट होत आहे. या घटनेमुळे आग्रा रोड परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. बाजारपेठ पोलिसांनी फारूख अख्तर (६२) यांच्या जबानीवरून चौघा फरार बदमाशांच्या विरोधात जबरी लुटीचा गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्यांचा शोध सुरू केला आहे.