

डोंबिवली : एकीकडे दिवाळी सुखाची आणि आनंदात साजरी होत असताना दुसरीकडे कल्याणातील एका बहिणीने रक्ताच्या नात्यात नसलेल्या एका भावाची ओवाळणी करून समाजाला नवा संदेश दिला आहे. या बहिणीची रिक्षात ऐवजाची बॅग विसरली होती. ही बॅग रिक्षावाल्या भावाने जशीच्यातशी या बहिणीला परत केली. या बहिणीने आपल्या सख्ख्या भावाप्रमाणे रिक्षावाल्या भावाची ओवाळणी केली.
सुरेखाताईंची दिवाळी सुखात तर गेलीच, पण तिला एक भाऊ असतानाही या दिवाळीत दुसरा भाऊ भेटला. भाऊबीजेच्या दिवशी कल्याणला उतरल्यावर सुरेखाताईने गुरूदेव होटेलजवळून विजय सोनार या आपल्या भावाच्या घरापर्यंत रिक्षा ठरविली. ताई व मुलगा रिक्षात बसले. बॅग थोडी आकाराने मोठी असल्याने मुलाने ती मागे ठेवली. या बॅगेत कपडे, दिवाळीचा फराळ आणि पैशाचे पाकीट, दागिने ठेवले होते. माहेर आल्यानंतर घाईघाईत रिक्षावाल्याला पैसे देऊन माय-लेक रिक्षातून उतरून घरी गेले.
दोघांच्याही हातात बॅग नसल्याची जाणीव झाल्यावर पळत इमारतीच्या गेटवर आले. पण रिक्षा कधीच निघून गेली होती. सगळी हकीकत भावाला सांगितली. रिक्षाचा नंबरही ठाऊक नाही. इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज पाहून पुढे तक्रार करायचे ठरले. अशाही वातावरणात भाऊबीज संपन्न झाली. पण ताईचे मन अस्वस्थ होते. पंचवीस ते तीस हजाराचा ऐवज त्या बॅगमध्ये होता.
अचानक घराची बेल वाजली, वॉचमन आणि एक व्यक्ती दरवाज्यात उभी होती. मी दिलीप दगडू हंगे, कल्याणाचा रिक्षावाला आहे, अशी त्याने ओळख सांगितली. घरात दोन-तीन तास ज्यांची चर्चा होती तेच समोर उभे होते. त्यांना घरात बोलावले, त्यांच्या हातात बॅग होती. सर्वांचे चेहरे आनंदित झाले. त्यांच्याशी बोलणे सुरू असतानाच, सुरेखाताईने ओवाळणी करण्याकरिता ताट घेऊन आली. तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. दिलीप हंगे यांच्या रूपात त्या ताईला आणखी एक भाऊ मिळाल्याची जाणीव झाली.