

कल्याण : कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पुष्पराज हॉटेल मार्गावरील परिसरातील व्यापारी भाग गुरुवार सायंकाळपासून तब्बल बावीस तास अंधारात बुडाला. वीज वाहिनीतील बिघाडामुळे वीज पुरवठा खंडित झाला.
शुक्रवार दुपारपर्यंत वीजपुरवठा सुरू नव्हता. ऐन सणासुदीच्या काळात वीजपुरवठा बंद राहिल्याने व्यापारी वर्गामध्ये संतापाची लाट उसळली आणि त्यांनी अचानक दुकाने बंद ठेऊन आपला रोष व्यक्त केला. मात्र माजी आमदार नरेंद्र पवार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत महावितरण, केडीएसमी आणि वाहतूक पोलीस अधिकार्यांशी संवाद साधल्यानंतर वीज वाहिनी दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले.
ऐन गणेशोत्सवाच्या काळात हा वीजपुरवठा खंडित झाल्याने येथील व्यापारी वर्गाने एकत्र येत दुकाने बंद ठेवून महावितरणच्या कारभारा विरोधात निषेध नोंदवला. सणासुदीत दुकानदारांना विक्रीतून मोठी कमाई अपेक्षित असते. मात्र 22 तास वीजपुरवठा बंद मुळे व्यवहार ठप्प झाले. काही व्यापार्यांच्या दुकानातील मिठाई, दुग्धजन्य पदार्थ आदी वस्तूंनाही फटका बसला. व्यापार्यांनी महावितरणवर थेट निष्काळजीपणाचा आरोप केला.
दरम्यान माजी आमदार नरेंद्र पवार यांनी व्यापार्यांनी दुकाने बंद ठेवल्याची माहिती मिळताच त्वरित घटनास्थळी धाव घेत महावितरण अधिकार्यांशी संपर्क साधत वीज वाहिनीची दुरुस्ती तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले. विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू पाहताच व्यापारी वर्गानें आपला बंद मागे घेतला.