

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : "भारत यापुढे बहुसंख्यांकाच्याच इच्छेप्रमाणे वागेल" मुस्लिमांना हीनवणारा "कटमुल्ला" हा शब्द वापरून 'कटमुल्ला विरूद्ध देश' असा शब्दप्रयोग अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस. के . यादव यांनी विश्व हिंदू परिषदेने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात केला.
याची दखल सर्वोच्च न्यायालयाने घ्यावी अन्यथा या देश अराजकतेकडे झुकेल, अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेस ( एसपी) सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक्स पोस्टवर व्यक्त केली आहे. एका उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाने संविधानाने दिलेल्या धर्मनिरपेक्ष तत्त्वाचा सन्मान करण्याऐवजी अपमानच केला आहे, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.
भारत हा लोकशाहीप्रधान देश आहे आणि लोकशाहीमध्ये सर्वांना समान मानावे, असे संकेत असताना संख्येच्या नुसार वागावे, असे जर हायकोर्टाचे न्यायाधीश सांगत असतील तर हा देश अराजकतेकडे झुकेल. सर्वोच्च न्यायालय जर या विधानाची दखल घेणार नसेल तर या देशाचे पुढील दिवस कठीण जातील. हा एका न्यायाधीशाने दिलेला इशारा आहे तो सर्वोच्च न्यायालयाने गांभीर्याने घ्यावा; अन्यथा, प्रत्येक राज्यातील एक न्यायाधीश हेच बोलायला तयार होईल, अशी भीतीही त्यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे व्यक्त केली आहे.