

भाईंदर : मिरा-भाईंदर येथील भारतरत्न स्व. पंडित भीमसेन जोशी या शासकीय रुग्णालयातील स्थायी परिचारिकांनी वेतनवाढ, वेतनातील त्रुटी, कामांच्या तासांमधील सुधारणांसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवारी काम बंद आंदोलन छेडले. हे आंदोलन बेमुदत असल्याचे सांगण्यात आल्याने त्याचा परिणाम रुग्णालयातील रुग्णसेवेवर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
परिचारिकांचे हे आंदोलन राज्य तसेच जिल्हाव्यापी नव्हे तर केवळ जोशी रुग्णालयापुरती मर्यादित असल्याचे सांगण्यात आले. परिचारिकांनी आंदोलन छेडल्याने रुग्णालयातील रुग्णसेवा काहीशी विस्कळीत झाल्याचे दिसून आले. या परिचारिका वैद्यकीय शिक्षण नर्सिंग स्टाफ या संघटनेशी संलग्न आहे. हि संघटना संपावर गेल्याने जोशी रुग्णालयातील परिचारिकांनी आंदोलन छेडल्याचे सांगण्यात आले.
या परिचारिकांनी वेतनवाढ मिळण्यासह वेतनातील त्रुटी, सेवा वाढ, पद बदल सुविधा सुरु करणे, प्रशासकीय बदल्या करणे, राज्य सुश्रुषा सेल निर्माण करणे, कंत्राटी कर्मचार्यांची नियुक्ती न करणे, निवासस्थानाची सुविधा उपलब्ध करून देणे आदी प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवारी आंदोलन छेडले असले तरी ते बेमुदत असल्याचे सांगण्यात आले.
परिचारिकांच्या आंदोलनामुळे रुग्णालयातील रुग्णसेवा विस्कळीत झाली असली तरी रुग्णालयातील कंत्राटी कर्मचार्यांच्या सहकार्याने रुग्णसेवा सुरु विनाखंड सुरु असल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आला. परिचारिकांनी आंदोलन छेडू नये, यासाठी रुग्णालय प्रशासनाने त्यांना मनाई केली होती तरी त्यांनी आंदोलन छेडले. मात्र त्याचा रुग्णसेवेवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
रुग्णालयातील परिचारिकांनी अचानक आंदोलन छेडल्याने रुग्णसेवेत अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी कंत्राटी कर्मचार्यांच्या मदतीने रुग्णसेवा सुरळीत सुरु ठेवण्यात आली. तसेच काही शस्त्रक्रिया देखील यशस्वीपणे पार पाडण्यात आल्या. दुसर्या दिवशी परिचारिकांनी आंदोलन करू नये, यासाठी त्यांना नोटिसा बजाविण्यात आल्या असता त्यांनी त्या स्विकारल्या नाहीत. यामुळे परिचारिकांच्या संभाव्य काम बंद आंदोलनाच्या दृष्टीने रुग्णसेवा निरंतर सुरु ठेवण्यासाठी भक्तिवेदांत रुग्णालयातील परिचारिकांना पाचारण करण्यात आले आहे.
डॉ. जाफर तडवी, रुग्णालय अधिक्षक