

ठाणे : राबोडी येथील गाजलेल्या जमील शेख हत्याकांडाची आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विशेष तपास पथक (SIT) नेमावे, अशी थेट मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. त्याचबरोबर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या 'सनातनी दहशतवाद' या वक्तव्याचे समर्थन आव्हाड यांनी केले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना आव्हाड यांनी ही भूमिका मांडली. ते म्हणाले, "ज्ञानेश्वरी मुंडे प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्याप्रमाणे SIT नेमून तपास केला, त्याच धर्तीवर जमील शेख हत्याकांडाचीही चौकशी व्हायला हवी."
यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यावर बोलताना आव्हाड यांनी सनातनी विचारधारेवर थेट हल्ला चढवला. "सनातनी धर्मानेच भारताचे वाटोळे केले. ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारला, छत्रपती संभाजी महाराजांना बदनाम केले, महात्मा फुले आणि शाहू महाराजांच्या हत्येचा प्रयत्न केला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पाणी नाकारले, तो हा सनातनी धर्म आहे. त्यामुळे सनातनी विकृत आहेत, हे बोलण्यास कोणीही घाबरू नये," असे म्हणत त्यांनी चव्हाण यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला.
भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण
जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतलेली भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. राज्यातील बदलत्या समीकरणांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, हे गुलदस्त्यात असले तरी, या भेटीमुळे विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. आव्हाडांच्या आक्रमक भूमिकेमागे या भेटीचे काही राजकीय संदर्भ आहेत का, यावर आता चर्चा सुरू झाली आहे.