ठाणे; पुढारी वृत्तसेवा : सोमवारी (दि. १३) सकाळी आठ वाजता कळव्यातील आमदार निधीतून केलेल्या कामांचा उल्लेख असलेल्या एलईडी बोर्डवर ठाणे महापालिकेने कारवाई केली. जितेंद्र आव्हाड यांनी यानंतर संताप व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे. या कारवाईनंतर आगामी काळात ठाण्यात बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी यांच्यातील संघर्ष विकोपाला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रविवारी (दि. १२) मुंब्र्यातील काही विकास कामांचा उद्घाटन सोहळा पार पडला. खासदार डॉ श्रीकांत शिंदे आणि शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. यावेळी म्हस्के यांनी आव्हाड यांच्यावर तीव्र शब्दात टीका केल्या, ते म्हणाले की, आव्हाड यांचा कळवा-मुंब्र्यातील राजकीय शेवट जवळ आला आहे.
या टिकेनंतर जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. आव्हाडांचा अंत करू. आव्हाडांचा शेवट जवळ आला आहे. गद्दार सेनेचे प्रवक्ते. देव त्यांना सद्बुद्धी देवो. ओम शांत शांत… असे ट्विट करीत आव्हाड यांनी संताप व्यक्त केला. या ट्विटनंतर सोमवारी (दि. १३) ठाणे महापालिकेने सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आव्हाड यांच्या आमदार निधीतून कळव्यात उभारण्यात आलेला एलईडी बोर्ड काढून टाकला. त्यानंतर आव्हाड अजून भडकले आणि म्हणाले की, किती हे सुडाचे राजकारण आहे? कळव्याच्या पूर्वेला मी जी आमदार निधीतून कामे केली आहेत, त्या कामांचा उल्लेख असलेला एलईडी बोर्ड आमदार निधीतून लावण्यात आला होता. आज सकाळी अचानक ८ वाजता महापालिकेचे अधिकारी मनीष जोशी यांच्या नेतृत्वाखाली त्या बोर्डाची मोडतोड करून, तो बोर्ड काढण्यात आला. साहेब फोन आल्यावर मी नाही म्हणून शकतो का? असे उत्तर पालिका अधिकाऱ्यांनी दिले. याचा अर्थ फोन कोणाचा आला असेल हे मला समजले आहे, असे मत व्यक्त करत आव्हाड यांनी शिंदे गटाचे नाव न घेता आरोप केले आहेत.
राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी आपण श्रीकांत शिंदे यांना फार गांभीर्याने घेत नाही. ते काय म्हणतात, यापेक्षा २०२४ च्या निवडणुकीत २०१९ पेक्षा अधिक मताधिक्याने जितेंद्र आव्हाड निवडून येतील. श्रीकांत शिंदे आणि शकुनी मामा यांना काय वाटते, यापेक्षा कळवा-मुंब्य्राच्या लोकांना काय वाटत आहे, हे अधिक महत्वाचे आहे. काल त्यांनी जे वक्तव्य केले ते लोकांनाही आवडलेले नाही. जितेंद्र आव्हाडांच्या शेवटाला सुरुवात झालीय, हे वाक्य नागरिकांना आवडलेले नाही. यातून तुमची संस्कृती आणि तुमच्यावर झालेले संस्कार दिसून येत आहेत. तुमचा सत्तेचा माज दिसतो. सत्तेत असताना अधिक नम्र असावे; पण, येथे उलट चालले असून सत्तेचा, प्रशासनाचा आणि पोलिसांचा दुरुपयोग केला जात आहे. जेव्हा जनाधार विरोधात जाते तेव्हाच या सगळ्या पद्धतींचा दुरुपयोग केला जातो, अशी टीका आनंद परांजपे यांनी केली.
हेही वाचा