

ठाणे : शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे गटनेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी त्यांची जाहीर पत्रकार परिषद सुरु असताना अचानक या पत्रकार परिषदेत पोलीस घुसल्याने जितेंद्र आव्हाडांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांवर वॉच ठेवण्यापेक्षा वाल्मिकी कराडवर वॉच ठेवा अशी टीका आव्हाड यांनी यावेळी केली आहे.
आमदार जितेंद्र आव्हाड यांची त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी एका महत्वाच्या विषयावर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. ही पत्रकार परिषद सुरु असताना मध्येच या पत्रकार परिषदेत पोलीस घुसले. ठाण्याच्या एसबी (विशेष शाखा) पोलीस या सर्व पत्रकार परिषदेचे चित्रीकरण करत होते.
यावर जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत पोलिसांच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त केला आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांवर पोलीस का वॉच ठेवत आहेत असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. माझ्या खासगी घरात पत्रकार परिषद सुरू असताना पोलीस घुसतात कसे? सरकारला नक्की वॉच ठेवून काय करायचे आहे? असे अनेक प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केले असून पोलिसांनी आमच्यावर वॉच ठेवण्यापेक्षा वाल्मिकी कराडवर वॉच ठेवावा असा टोला देखील आव्हाड यांनी सरकारला लगावला आहे.