कोपरखैरणे : जिओ कंपनीचे बेसबँड युनिट चोरी करणार्या टोळीला गुन्हे शाखेने अटक केली. या टोळीकडून 56 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अशाच प्रकारे त्यांनी विविध ठिकाणी केलेल्या 13 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. मधुकर रमेश गायकवाड, अभिषेक दिपक काकडे (दोघेही मूळ परभणीचे ) सौरभ सतीश मंजुळे, (रा. रायगड) आणि नाशिक येथील दानिश इर्शाद मलिक असे अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
26 जून ते 6 जुलैदरम्यान खांदेश्वर, तळोजा, पनवेल परिसरात इंटरनेट व मोबाईल सेवा देणार्या जिओ कंपनीच्या टॉवरवर असणारे फाय जी बेसबँड युनिटच्या चोरीच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे सेवा विस्कळीत होण्याचे प्रकार वाढले होते. याबाबत पोलीस ठाण्यात वेळोवेळी गुन्हे नोंद करण्यात आले. अनेक प्रकार एकसमान घडल्याने हि टोळी असावी असा संशय पोलिसांना होता. त्या अनुषंगाने गुन्हे शाखा उपायुक्त अमित काळे यांच्या मार्गदर्शखाली व सहाय्यक पोलीस आयुक्त अजयकुमार लांडगे यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिंदे व अन्य अधिकार्यांची विविध तीन पथके स्थापन करण्यात आली.
या पथकाने घटनास्थळाचे परिसरात उपलब्ध सरकारी व खासगी उपलब्ध सिसीटिव्ही फुटेजची पाहणी, तांत्रिक तपास व खबर्यांना सतर्क करून माहिती गोळा करणे सुरु केले. त्यात तांत्रिक माहितीचे विश्लेषण केले असता यातील संशयित हे मालेगाव, सटाणा व परभणी येथील असल्याचे समोर आले. एकाच वेळेस अटक करण्यासाठी दोन पोलीस पथकांसह सापळा रचून शिताफीने मुंबई -आग्रा हायवेवर पडघा परिसरात तीन संशयितांना ताब्यात घेतले.
संशयित आरोपी हे यापूर्वी इंटरनेट मोबाईल सेवा देण्यार्या कंपनीत कामाला होते. त्यामुळे चोरी केलेल्या युनिटची त्यांना माहिती होती. यातील मधुकर गायकवाड हा अभिलेखावरील आरोपी असून त्याच्या नावे अनेक गुन्हे नोंद आहेत. आरोपींवर संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा नोंद केला आहे.