जावा पर्यटनाच्या गावा... ठाणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे निसर्ग सौंदर्याचा खजिना

पुढारी विशेष ! निसर्गाने समृद्ध असलेला जिल्हा अशी ठाणे जिल्ह्याची वेगळी ओळख
ठाणे
निसर्गाने समृद्ध असलेला जिल्हा अशी ठाणे जिल्ह्याची वेगळी ओळख आहे.Pudhari News Network
Published on
Updated on

ठाणे : निसर्गाने समृद्ध असलेला जिल्हा अशी ठाणे जिल्ह्याची वेगळी ओळख आहे. वैतरणा आणि उल्हास या दोन महत्त्वाच्या नद्या, तानसा अभयारण्य, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, गडकिल्ले, पर्वतरांगा, माळशेज घाट, तुंगारेश्वर धबधबा ही सर्व पर्यटनस्थळे सुरुवातीपासूनच पर्यटकांना आकर्षित करत आली आहेत. ठाणे जिल्हा हा मुंबईला लागून असल्याने विशेष करून मुंबईवरून येणार्‍या पर्यटकांसाठी ही सर्व ठिकाणे नेहमीच आकर्षणाचा विषय ठरली आहेत.

ठाणे
तानसा धरण शांततेमुळे लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. Pudhari News Network

तानसा धरण, अभयारण्य

मुंबईतील हे धरण त्याच्या नयनरम्य वातावरण आणि शांततेमुळे लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. शांततेत संध्याकाळ घालवण्यासाठी व दिवसा सहलीसाठी लोक येथे मोठ्या संख्येने येतात. हे धरण 1925 मध्ये बांधण्यात आले होते; परंतु वर्षांनुवर्षे पिण्याच्या पाण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी धरणाची उंची सतत वाढवली जात आहे. धरणाच्या अगदी जवळच तानसा तलाव आहे. तानसा वन्यजीव अभयारण्य हे ठाणे जिल्ह्यातील शाहपूर, वाडा, मोखाडा तालुक्यांत 320 चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले आहे.

ठाणे
ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात गोरखगड हा डोंगरी किल्ला आहे.Pudhari News Network

गोरखगड किल्ला

ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात गोरखगड हा डोंगरी किल्ला आहे. गोरखगड व मच्छिंद्रगड हे ठाणे जिल्ह्यातील जुळे किल्ले आहेत. गोरखगड त्याच्या जुळ्या किल्ल्यापेक्षा जास्त उंचीवर आहे. येथे पाण्याचे अनेक कुंड आहेत. त्यातील काही पाणी पिण्यायोग्य आहे. शिखराच्या पायथ्याजवळ विखुरलेल्या असंख्य गुहा आहेत आणि त्यापैकी काही राहण्यायोग्य आहेत. किल्ल्याकडे जाणारा वळण मार्ग घनदाट वनस्पतींनी समृद्ध आहे. शिखरावर शिवमंदिर असून किल्ल्याच्या शिखरावर ‘नंदी’ बैलाची मूर्ती आहे. ठाणे जिल्ह्यातील जवळचे पर्यटनस्थळ म्हणून या दोन किल्ल्यांचा उल्लेख आवर्जून करावा लागतो.

ठाणे
वसई तालुक्यातील तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्याच्या आवारात तुंगारेश्वर धबधबा आहे.Pudhari News Network

तुंगारेश्वर धबधबा

वसई तालुक्यातील तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्याच्या आवारात तुंगारेश्वर धबधबा आहे. मुंबई आणि शेजारच्या शहरांमधील पर्यावरण प्रेमींसाठी सुट्टीच्या दिवशीचे हक्काचे ठिकाण म्हणून तुंगारेश्वर धबधब्याला विशेष महत्त्व आहे. पावसाळ्यात समृद्ध आणि वैविध्यपूर्ण वन्यजीवांचा वावर या परिसरात पाहायला मिळतो. निसर्गप्रेमी आणि फोटोग्राफी करणार्‍यांसाठी हे ठिकाण विशेष पर्वणीच आहे. या ठिकाणी एक छोटे शिवमंदिरदेखील आहे. ठिकाण ः वसई (तुंगारेश्वर), ठाणे.

ठाणे
ठाण्यातील भिवंडी जिल्ह्यात वसलेले वज्रेश्वरी. याला वज्राबाई म्हणूनही ओळखले जाते. Pudhari News Network

वज्रेश्वरी

ठाण्यातील भिवंडी जिल्ह्यात वसलेले वज्रेश्वरी. याला वज्राबाई म्हणूनही ओळखले जाते. हे ठाणे जिल्ह्यातील तानसा नदीजवळील एक छोटे शहर आहे. शहराचे वैशिष्ट्य म्हणजे अतिशय प्रसिद्ध आणि अत्यंत आदरणीय वज्रेश्वरी मंदिर व त्याचे गरम पाण्याचे झरे. असे मानले जाते की, हे गाव ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे तयार झाल्याने या ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत. नागरिक खास गरम पाण्याच्या झर्‍यांचा अनुभव घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात. ठिकाण ः भिवंडी, ठाणे

ठाणे
माहुली किल्ला ट्रेकिंगचे एक अतिशय लोकप्रिय ठिकाण आहे.Pudhari News Network

माहुली किल्ला

2,815 फूट उंचीवर, एका शक्तिशाली टेकडीवर वसलेला माहुली किल्ला केवळ ठाण्यातील सर्वोच्च शिखर नाही, तर ट्रेकिंगचे एक अतिशय लोकप्रिय ठिकाण आहे. रॉक क्लाइंबर्स आणि साहसीप्रेमींसाठी आश्रयस्थान मानले जाते. घनदाट हिरव्या जंगलाने हे ठिकाण वेढलेले असल्याने पर्यटकांमध्ये या ठिकाणचे खास आकर्षण आहे. किल्ल्यामध्ये एक खुले शिव मंदिर आणि तीन गुहा आहेत. याशिवाय या ठिकाणी वर एक बारमाही पिण्याच्या पाण्याचा कुंड आहे. सभोवतालचा हिरवागार भाग अभयारण्य घोषित करण्यात आला आहे.

ठिकाण : माहुली, ठाणे

ठाणे
नाणेघाट डोंगर हे एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहेPudhari News Network

नाणेघाट डोंगर

नाणेघाट डोंगर हे एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. पावसाळ्यात ठाण्याजवळ भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. समुद्रसपाटीपासून 838 मीटर उंचीवर डोंगर घाटमाथा ते कोकण क्षेत्रापर्यंत पसरलेल्या डोंगराच्या खिंडीसाठी ओळखले जाते. या डोंगरांमध्ये सापडलेल्या लेण्यांमध्ये ब्राह्मी भाषेत दगडावर कोरलेले शिलालेख आहेत. प्रवासी ट्रेकिंग व रस्त्याने डोंगराच्या वर पोहोचू शकतात. त्यामुळे एकदा तरी या ठिकाणी जाऊन येण्याचा सल्ला पर्यटकांना दिला जातो. ठिकाण ः नाणेघाट, घाटघर, ठाणे

ठाणे
कल्याण-नगर रस्त्यावर महत्त्वाचे पर्यटनस्थळ म्हणून माळशेज घाटाची ओळख आहे.Pudhari News Network

माळशेज घाट

कल्याण-नगर रस्त्यावर महत्त्वाचे पर्यटनस्थळ म्हणून माळशेज घाटाची ओळख आहे. आतापर्यंत पावसाळी पर्यटनस्थळ म्हणून हे प्रचलित ठिकाण असले तरी लवकरच महाबळेश्वर व माथेरानप्रमाणे बारमाही थंड हवेचे ठिकाण म्हणून विकसित होत आहे. पावसाळ्यात दाट धुक्याची शाल पांघरलेला हा डोंगर दर्‍याचा परिसर पर्यटकांना खुणावतो. माळशेज घाटात पर्यटकांसाठी खास पॉईंट केले आहेत. पर्यटकांच्या वाहनांसाठी रस्त्यावर दोन ठिकाणी खास पार्किंग व्यवस्था आहे.

ठाणे
एल्विस बटरफ्लाय गार्डन हे ठाण्यातील एक प्रमुख पर्यटनस्थळ आहे.Pudhari News Network

एल्विस बटरफ्लाय गार्डन

एल्विस बटरफ्लाय गार्डन हे ठाण्यातील एक प्रमुख पर्यटनस्थळ आहे. येथे फुलपाखरांच्या 132 पेक्षा जास्त प्रजाती असून या ठिकाणाला वर्षभर भेट देऊ शकता. फुलपाखरांच्या जीवनातील विविध टप्प्यांची माहिती येथे मिळते. अंड्यापासून सुरवंट ते फुलपाखारांपर्यंतच्या प्रवासाची माहिती या ठिकाणी मिळते. एल्विस बटरफ्लाय गार्डन कुटुंबांसाठी एक मजेदार आणि आरामदायी पिकनिक स्पॉट आहेे. ते ठाण्यापासून 8 किमी अंतरावर आहे. त्यामुळे या ठिकाणी जाण्यासाठी बस सेवाही उपलब्ध आहेत.

ठिकाण : गोवनिवाडा, ओवाळे, ठाणेPudhari News Network

ठाणे
घोडबंदर किल्ला सर्वात जुना आणि प्रसिद्ध किल्ल्यांपैकी एक आहे. Pudhari News Network

घोडबंदर किल्ला

घोडबंदर किल्ला सर्वात जुना आणि प्रसिद्ध किल्ल्यांपैकी एक आहे. तो 16 व्या शतकात बांधण्यात आलेला आहे. या ठिकाणाचे नाव दोन शब्दांवरून पडले आहे, घोड म्हणजे घोडे आणि बंदर म्हणजे किल्ला. सुरुवातीला पोर्तुगीजांनी त्यांच्या घोड्यांचा अरमाराबरोबरच व्यापार करण्यासाठी वापर केला होता. या किल्ल्याच्या संवर्धनासाठी ठाण्यातील लोकप्रतिनिधीनींही पुढाकार घेतला आहे. हा किल्ला पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून पर्यटक या ठिकाणी गर्दी करतात. ठिकाण ः घोडबंदर गाव, मीरा भाईंदर, ठाणे

कसे जाल...

  • ठाणे रेल्वे स्थानकावरून तानसा येथे जाण्यासाठी रेल्वेने जायचे असल्यास आसनगाव आणि आसनगाववरून 7 ते 8 किलोमीटर वाहनाने जाऊन या अभयारण्याकडे जाता येते. रस्ते मार्गाने मुंबई-अहमदाबाद जाता येते.

  • ठाण्यातील बटरफ्लाय उद्यानात जाण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकावरून ठाणे महानगपालिकेच्या टीएमटी बसने 30 ते 40 मिनिटांत पोहोचता येते.

  • येऊरला जाण्यासाठीही ठाण्यावरून टीएमटीच्या बसेस उपलब्ध आहेत. साधारण 45 मिनिटांत टीएमटी बसेसने पोहोचता येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news