

डोळखांब : दिनेश कांबळे
महाराष्ट्र शासनाने राष्ट्रपती पदक विजेत्या तमाशा कलावंत दिवंगत विठाबाई भाऊ मांग यांचा स्मृतिदिन नुकताच साजरा केला. परंतु त्यांच्या आठवणींना आणि प्रतिकुल परिस्थितीला उजाळा देत असतांना शहापूर या कलाकारांच्या पंढरीत असंख्य कलाकार आजही उपेक्षित असल्याचे लक्षात येते.
खरे पाहिले तर शहापूर हा दर्याखोर्यांनी व्यापलेला तालुका. गेले अडीच दशक याठिकाणी मनोरंजनाची कोणतीही साधने उपलब्ध नव्हती. अशा परिस्थितीत याठिकाणी खेडेपाड्यातील कलाकार फिरते तमाशे, भारूड, कीर्तन, बोहाडे यासारखे कलाप्रकार सादर करून अतिशय प्रतिकुल परिस्थितीत तुटपुंजी बिदागी घेऊ न लोकांचे मनोरंजन करीत असत. आज ही जागा मोबाईल आणि टीव्ही चॅनेलने घेतल्याने प्रत्यक्ष सादरीकरण थांबले आहे.
तसे पाहिले तर लोककला, पारंपरिक नृत्य, गाणं, नाटक, काव्य गायन, लोकधुन वाजविणे, बासरी, ढोलकी, तबला, हार्मोनियम वाजविणे, लेखक, साहित्यिक, तमासगीर, जोंधळी, शाहीर हे कलाप्रकार प्रचलित आहेत. परंतु शहापूर हा दुर्गम भाग असला तरी याठिकाणी कलाकारांचा कारखाना तसेच कलेवर प्रेम करणारा चाहता वर्ग मोठा आहे.
यामध्ये प्रामुख्याने नाव घेता येतील ती अशी व्यक्तिमत्वे म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळीत भाग घेणारे तसेच शाहीर अमर शेख व दादा कोंडके, तमाशा कलावंत तुकाराम खेडकर यांचा सहवास लाभलेले शहापूर तालुक्यातील भिनार गावचे सुपुत्र दिवंगत शाहीर शंकरराव कुलकर्णी. त्याचप्रमाणे भारताच्या गानकोकिळा लतादिदी मंगेशकर यांचे संगीत संचामध्ये शहनाई तसेच ढोलकी व तबला वाजवून शहापूर तालुक्याचा झेंडा अटकेपार रोवणारे दिवंगत मनोहर कदम व अशोक कदम या जोडगाळीचे योगदान ही महत्वाचे आहे. तसेच जवा नवीन पोपट हा, लागला मिटू मिटू बोलायला... या गिताचे गीतकार मानवेल गायकवाड हे शहापूर तालुक्यातील वासिंद शहरामध्ये रहातात. त्यांनी लिहिलेल गीत गायक आनंद शिंदे यांनी आपल्या पहाडी आवाजाने गाऊ न अखंड महाराष्ट्रातील तरुणाईवरच नव्हे तर वृद्धांवर देखील गारूड घातले आहे. तसेच दाताच दातवण घ्या गं कुणी, कुंकु घ्या कुणी काळं मणी, नांदण नांदण... होत रमाच नांदण यासारखी साडेचार हजार लोकगीते, भिमगीते, कोळीगीते, भक्तीगीते लिहिणारा कसारा येथील अवलिया प्रकाश पवार यांनी शासनाच्या घराच्या प्रतीक्षेत गेल्या वर्षभरापूर्वी अखेरचा श्वास घेतला. अनेक मराठी सिनेमांसाठी गीत लिहिणार्या पवार यांच्या कुटुंबाला अजूनही घर मिळाले नाही ही शोकांतिका आहे.
गेली तीस दशके शहापूरच्या ग्रामिण रंगभूमिवर आपल्या लेखणीने आणि अभिनयाने नाट्यकला जिवंत ठेवणारे पांढरीचा पाडा येथील नाटककार पंढरीनाथ पांढरे हे हौशी कलाकार. यांच्या मातीमाय या शेतकर्यांचे जीवनावर आधारित नाटकाला राज्य नाट्य स्पर्धेत 67 प्रयोगांमधून प्रथम क्रमांक मिळाला. तीस वर्ष खिशाला चाट देऊ न कलेवर प्रेम करून कला सादर करणार्या सह्याद्री कलासंघाच्या टीमला मिळणार्या तुटपुंज्या पैशातून गरीब विद्यार्थांना आजही मदत केली जाते. याच नाटकाचे रूपांतर सिनेमात करून अगदी कमी खर्चात कसा सिनेमा तयार करता येतो याची हिंमत करणार्या सह्याद्री कलासंघाचा येणारा मातीमाय सिनेमा आजही आर्थिक अडचणीमुळे रखडला आहे.
सद्या सुरू झालेल्या लक्ष्मी निवास, तसेच यापूर्वीच्या जय मल्हार, विठु माऊली अशा असंख्य मालिका व मराठी सिनेमांसाठी काम करणारा महेश फाळके हा डोळखांबचा रहिवाशी आणि पंढरीनाथ पांढरे यांचा शिष्य. तर सुभाष शिंदे (प्रा. शिक्षक) हे गंगुबाई नॉनमॅट्रीक मालिकेत काम करणारे कलाकार देखील डोळखांब गावचे. अजिंक्य पितळे, दीपक सरोदे, उत्तम शेट्टी हे नाट्य तसेच मालिका कलावंत शहापूरच्या मातीत वाढलेले. टॉपचे संगीतकार बाळू पाटेकर हे देखील शहापुरातील बिरवाडी गावचे रहिवाशी. रंगभूषाकार शिरीष पितळे तसेच महेंद्र झगडे, मानशी झगडे, रवींद्र पितळे हे मोठमोठ्या कलाकारांना रंगभूषा करणारे कलाकार देखील शहापूरचे रहिवाशी आहेत.
भारतातील उच्चकोटीचे संगीतकार पंडित हरिप्रसाद चौरासिया यांचे शिष्य बासरी वादक उत्कर्ष जाधव हे आसनगाव येथील असून सद्या ग्वाल्हेर येथे संगीत शिक्षण घेत आहेत. बासरीवादक नकुल भेरे, निखिल शेलवले चांगले कलाकार आहेत. तर तरुण संगीत डायरेक्टर ज्यांचे असंख्य अल्बम असून 2013 मध्ये सह्याद्री दूरदर्शन वाहिनीवर सिनेअभिनेत्री मधुराणी गोखले (प्रभुलकर) यांनी मुलाखत घेतलेले सुमेध जाधव यांचा आजही शहापुरात चांगला बोलबाला आहे.
तसेच या मातीने चांगले लेखक, कवी, भारूडकार, नाटककार, कीर्तनकार, बासरीवादक, तमासगीर, नृत्य कलाकार तालुक्याला दिले म्हणून कलाकारांची पंढरी असा शहापूरचा नावलौकिक आहे. विशेष म्हणजे ऐतिहासिक शाहिरी परंपरा आजही जोपासणारे कलाकार प्रकाश धानके हे शहापूर तालुक्यातील असल्याने ही सर्वात मोठी अभिमानास्पद गोष्ट आहे.