

ठाणे ः प्रो गोविंदामध्ये प्रवेश न मिळालेल्या जय जवान गोविंदा पथकाने मंत्री प्रताप सरनाईक आयोजित संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहिहंडीत मुंबईनंतर पुन्हा एकदा दहा थरांचा थरथराट करत ‘इलाका तुम्हारा धमाका हमारा’ची घोषणा केली. मात्र त्यांना दुसर्या नंबरच्या बक्षिसावर समाधान मानावे लागले. पहिला विक्रम याच ठिकाणी कोकण नगर गोविंदा पथकाने गोपालकाल्याच्या दिवशी सकाळी केला होता. त्यांना 25 लाखांचे पहिले बक्षीस मिळाले.
ठाण्यात दहा थरांचे विक्रम दोन मंडळाने केले. तत्पूर्वी जय जवान मंडळाने घाटकोपर येथेही दहा थरांचा विक्रम केला होता. गोविंदा पथकांचा जल्लोष यावेळी अधिक प्रमाणात पाहायला मिळत होता. ठाण्यात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे संस्कृती युवा प्रतिष्ठान या मोसमात हीट ठरले. या बरोबरच ठाण्यात रवींद्र फाटक यांचे संकल्प, कृष्णा पाटील यांचे शारदा संकल्प प्रतिष्ठान आणि अविनाश जाधव यांची मनसेची हंडी अशा हंड्यांनी ठाणे शहरात नवे मोहन तयार केले.
मुंबई, ठाण्याच्या दहिहंड्या या सर्व राज्यातच आकर्षणाचा विषय असतात. यावेळी स्पेनच्या पथकांनीही हजेरी लावून या उत्सवाला आंतरराष्ट्रीय स्वरूप दिले. दरवर्षी नऊ थर लावून गोविंदा पथके आपले कौशल्य दाखवतात. यावेळी मात्र दहा थरांचा नवा विक्रम करत या उत्सवात नवी जान आणली. संस्कृती युवा प्रतिष्ठान येथे यापूर्वी नऊ थरांचा विक्रम झाला होता. आता त्याच मंडळाच्या जागेत दहा थरांचा विक्रमही नोंदवला गेल्याने हे युवा प्रतिष्ठान विक्रमांचे केंद्रस्थान ठरले. विशेष म्हणजे याच मंडळात दोन गोविंदा पथकांनी दहा थरांचा विश्वविक्रम केल्याची ऐतिहासिक नोंद झाली.