

डोंबिवली : राज्यातील अनेक ठिकाणी लूटमार करून दहशत माजवणारा सराईत चोरटा सलमान जाफरी उर्फ सलमान इराणी (३५) अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. पनवेल शहर पोलिसांनी ओळख पटवलेल्या या कुख्यात गुन्हेगाराला कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील आंबिवली स्टेशनजवळच्या इराणी काबिल्यातून फिल्मी स्टाईलने उचलले. तथापी या कारवाईदरम्यान नातेवाईकांनी नेहमीप्रमाणे पोलिसांवर झडप घालत सलमान जाफरी याला सोडवण्याचा प्रयत्न केला. हा संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
पनवेल शहरात अलीकडेच घडलेल्या एका सोनसाखळी चोरीच्या प्रकरणानंतर पोलिसांनी सखोल तपास करून आरोपीची ओळख पटवली होती. यातील आरोपी सलमान इराणी हा आंबिवलीतील इराणी काबिल्यात लपला असल्याची पक्की खबर मिळताच तात्काळ पनवेल शहर पोलिसांनी खडकपाडा पोलिसांशी संपर्क साधून संयुक्त कारवाईचा निर्णय घेतला. खडकपाडा पोलिस ठाण्याचे अधिकारी विजय गायकवाड यांच्या पथकासह पनवेल पोलिसांचे पथक रविवारी सकाळी इराणी काबिल्यात घुसले.
पनवेल पोलिस रेल्वे फाटकाजवळ अडकल्याने खडकपाडा पोलिस आधीच काबिल्यात पोहोचले. तेव्हा सलमान इराणी दिसताच पोलिसांनी अचानक झडप घालत त्याला पकडले. मात्र सलमानने तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला आणि त्याचे नातेवाईक घटनास्थळी जमले. त्यांनी सलमानला सोडवण्यासाठी पोलिसांवर हल्ला करून झटापट केली. तणावपूर्ण वातावरणातही पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत सलमानला घट्ट पकडून जेरबंद केले. काही वेळानंतर पनवेल पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले आणि सलमानला त्यांच्या ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी पनवेल शहर पोलिसांच्या स्वाधीन केले.
देशभरात धुमाकूळ घालणारा सराईत गुन्हेगार
सलमान इराणी हा अत्यंत सराईत व कुख्यात गुन्हेगार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातच नव्हे तर देशभरात चोरी, लूटमार आणि दरोड्याच्या घटनांमध्ये त्याचा सहभाग राहिला आहे. त्याच्या विरोधात पनवेल, भिवंडी, मुंबईसह महाराष्ट्रातील विविध ठाण्यांमध्ये, तसेच इतर राज्यांमध्येही गुन्हे दाखल आहेत. त्याला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर यापूर्वी अनेक वेळा हल्ले झाल्याचेही रेकॉर्ड आहे. सलमान इराणी हा काही काळापासून फरार होता. अखेर त्याच्या अटकेमुळे सोनसाखळी चोरीसह अनेक गुन्ह्यांच्या उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.