डोंबिवलीसह कोकणातील गुंतवणूकदारांना लाखोंचा चुना

चिपळूणच्या व्यावसायिकाने शेअर बाजाराच्या गुंतवणुकीतून घातला गंडा
Dombivli Fraud Case
डोंबिवलीसह कोकणातील गुंतवणूकदारांना लाखोंचा चुना.file photo
Published on
Updated on

डोंबिवली : शेअर गुंतवणुकीत गुंतवणूक केल्यास 20 टक्के परतावा देण्याचे अमिष दाखवून कोकणातील चिपळूण तालुक्याच्या निवळी-कोंडवाडी गावातील एका व्यावसायिकाने डोंबिवलीसह कोकण परिसरातील अनेक गुंतवणूकादारांची फसवणूक केली आहे. डोंबिवलीतील गुंतवणूकदाराला तब्बल 16 लाखांचा गंडा घातला आहे. या फसवणूकीप्रकरणी डोंबिवलीतील गुंतवणूकदाराने विष्णूनगर पोलिस ठाण्यात गुरूवारी (दि.१३) तक्रार दाखल केली आहे.

मुंबई महानगरपालिकेत नोकरी करणारे डोंबिवलीकर गुंतवणूकदार सुभाष रोडला असलेल्या नवापाडा परिसरात कुटुंबीयांसह राहतात. मुळचे चिपळूण तालुक्यातील सावर्डे गावचे रहिवासी असलेल्या डोंबिवलीकर गुंतवणूदाराला तीन वर्षांपूर्वी त्यांच्या नातेवाईक महिलेने चिपळूण जवळील निवळीचे एक गृहस्थ शेअर बाजारातील गुंतवणुकीतून 20 टक्के परतावा देतात, असे सांगितले. गुंतवणुकीवर कमी कालावधीत वाढीव परतावा मिळतो म्हणून डोंबिवलीकर गुंतवणूकदाराने प्रत्यक्ष, तसेच मोबाईलद्वारे संबंधित व्यावसायिकाशी संपर्क साधला. त्यानेही गुंतवणुकीवर 20 टक्के परताव्याची हमी दिली. रक्कम धनादेशाद्वारे नव्हे तर रोखीने रक्कम स्वीकारतो, अशी अट व्यावसायिकाने गुंतवणूकदारांना घातली होती.

व्यावसायिकावर विश्वास बसल्यावर डोंबिवलीकर गुंतवणूकदाराने दोन लाखांपासून शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सुरूवात केली. गुंतवणूक रकमेवर व्यावसायिकाने विहित वेळेत परतावा देण्यास सुरूवात केली. 4 लाख गुंतवणूक केल्यावर त्या रकमेवर 2 लाख 23 हजारांचा परतावा गुंतवणूकदाराला देण्यात आला. गुंतवणुकीवर जसा परतावा मिळत गेला तसा चिपळूणच्या व्यावसायिकाने डोंबिवलीकर गुंतवणूकदाराला अधिकची रक्कम गुंंतवणूक करण्यास भाग पाडले. व्यावसायिकाची पत्नी, आई, वडील, भाऊ यांनीही आपल्या गुंतवणुकीवर हमखास चांगला परतावा मिळेल, अशी हमी दिली होती.

वाढीव परताव्याच्या आमिषाने गुंतवणूकदाराने चिपळूणकर व्यावसायिकाकडे आपल्या नातेवाईकांच्या माध्यमातून 19 लाख रूपये रोखीने दिले. या रकमेवर अधिक परतावा मिळेल, असे डोंबिवलीकर गुंतवणूकदाराला वाटले. या गुंतवणुकीवर नियमितचा परतावा मागण्यास डोंबिवलीतील गुंतवणूकदाराने सुरुवात केली. त्यावेळी व्यावसायिकाने थोड्या अवधीत परतावा देतो अशी कारणे सांगून परतावा देण्यास टाळाटाळ सुरू केली. डोंबिवलीकर गुंतवणूकदाराने चिपळूण येथे जाऊन व्यावसायिकाची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्या नातेवाईकांनी तुमची रक्कम लवकरच मिळेल असे सांगितले. गुंतवणुकीच्या रकमेवर तुम्हाला 23 लाख रूपये 3 महिन्यांत देतो असे त्या व्यावसायिकाने एका हमीपत्रावर लिहून दिले. मात्र त्याची पूर्तता करण्यात आली नाही. काही मध्यस्थांच्या मदतीने व्यावसायिकाने आपल्या बँक ऑफ इंडियाच्या बँक खात्याचे दोन धनादेश गुंतवणूकदाराला दिले. व्यावसायिकाच्या खात्यात पैसे नसल्याने डोंबिवलीकरांना दिलेला धनादेश वटला नाही.

व्यावसायिक आपली फसवणूक करत असल्याची खात्री पटल्यानंतर डोंबिवलीकर गुंतवणूकदाराने व्यावसायिकासह त्याच्या वडील, भाऊ आणि पत्नीच्या विरोधात विष्णूनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या व्यावसायिकाने इतर अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचे डोंबिवलीकर तक्रारादाराने त्याच्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news