Tuberculosis free Thane | ठाणे 100 टक्के क्षयरोग मुक्तीसाठी पुढाकार

प्रभाग समितीनिहाय शिबिरांचे आयोजन करा; खा. नरेश म्हस्के यांच्या प्रशासनाला सूचना
Tuberculosis cases in Maharashtra
क्षयरोग मुक्तीpudhari photo
Published on
Updated on

ठाणे : क्षयरोग निर्मुलनासाठी ठाणे महापालिका करीत असलेल्या प्रयत्नांमुळेच ठाणे महापालिका राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे, ठाणे शहर 100 टक्के क्षयरोग मुक्त करण्यासाठी प्रभागसमिती निहाय नागरिकांची काटेकोरपणे तपासणी करावी, यासाठी क्षयरोग विभागाला अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी प्रशासनाला दिल्या.

मूल्यांकनात ठाणे शहर चौथ्या क्रमांकावर

क्षयरोग मुक्त मूल्यांकनात ठाणे शहर चौथ्या क्रमांकावर असल्याबाबत खासदारांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासह क्षयरोग विभागातील सर्व अधिकारी / कर्मचारी यांचे अभिनंदन केले. राष्ट्रीय दुरीकरण कार्यक्रमांतर्गत जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम, क्षयरोग विभाग गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन सोमवारी कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात आयोजित केले होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त (2) प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. राकेश बारोट, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. चेतना नितिल, क्षयरोगतज्ज्ञ व शहर क्षयरोग अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांच्यासह आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

क्षयरोग निर्मूलनासाठी ठाणे महापालिकेच्या क्षयरोग विभागाचे सर्व डॉक्टर्स, परिचारिका व कर्मचारी हे आपला जीव धोक्यात घालून आत्मीयतेने काम करीत आहेत. महापालिका दफ्तरी नोंद असलेल्या क्षयरुग्णांच्या घरी भेटी देवून संबंधित रुग्णांना आवश्यक उपचाराबाबत मार्गदर्शन करीत आहेत. या सर्वांच्याच प्रयत्नांमुळे क्षयरोगाबाबत राज्यशासनाकडून करण्यात आलेल्या मूल्यांकनात विविध महानगरपालिका आणि जिल्ह्यातील क्षयरोग विभागांमध्ये ठाणे महापालिकेने चौथा क्रमांक प्राप्त केल्याबद्दल खा. नरेश म्हस्के यांनी क्षयरोग विभागातील सर्व कर्मचार्‍यांचे कौतुक केले.

अतिरिक्त 15 हजार मानधन

क्षयरोग विभागात काम करणार्‍या कर्मचार्‍यांना शासनाकडून मानधन मिळत असते, पण हे कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करीत असल्यामुळे त्यांना अतिरिक्त 15 हजार मानधन देणारी ठाणे ही देशातील एकमेव महापालिका असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. ठाणे महापालिकेच्या क्षयरोग विभागास सीएसआर निधीतून 1 कोटीचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल महानगर गॅस लिमिटेडचे उपाध्यक्ष आत्मकुर चक्रपाणी व सीएसआरचे मुख्याधिकारी सुशांत राऊत तसेच मिंट कॉर्पोरेशनने सीएसआर निधीतून 1.25 कोटी रुपयांचा निधी दिल्याबद्दल उपमहाव्यवस्थापक इंदरदीप कौर यांचेही खासदार नरेश म्हस्के यांनी आभार मानले.

अधिकार्‍यांचा सन्मान

यावेळी क्षयरोग निर्मूलनाची मोहीम प्रभावीपणे राबविणारे क्षयरोगतज्ज्ञ व शहर क्षयरोग अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला, तर क्षयरोग विभागातील सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावणार्‍या निखिल लिंगायत, अशोक बोरोले, संजय पवार, साधना जाधव, स्वप्नाली भालेराव आदींना प्रातिनिधीक स्वरुपात खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते पारितोषिक देवून गौरविण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे यांनी क्षयरोग विभागामध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांना शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी ठाणे शहर 100 टक्के क्षयमुक्त करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील राहील, असा विश्वास व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news