डोंबिवली : भिवंडी जवळच्या ग्रामीण भागातील जांभुळपाडा गावात राहणाऱ्या एका तरूण भाजी विक्रेत्याला कल्याणमधील भाजी मंडईतील चौघा भाजी विक्रेत्यांनी कोंडी करून बेदम मारहाण केली आहे. मारहाण करणाऱ्यांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. या हल्ल्यात क्रेटचा वापर केल्याने भाजी विक्रेता जबर जखमी झाला आहे. जखमी झालेल्या तरूणाने दिलेल्या तक्रारीनुसार महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात चौघा हल्लेखोरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
भिवंडी जवळील सावद रस्त्यावरील जांभुळपाडा गावातील जितेश भागीनाथ जोशी (24) हा तरूण मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास कल्याणच्या भाजी बाजारात घाऊक भाजी खरेदीसाठी आला. एका शेतकऱ्याजवळील भाजी जितेश जोशी यानें खरेदी केली. त्याच्याजवळ वजन-काटा नव्हता. भाजीची वजनावर तोलायची असल्याने जितेश यांनी भाजी बाजारातील एका वजन-काटा दुकानदाराकडून भाजीचे वजन करून घेतले. या तोलाईचे पाच रूपये शुल्क झाले. जितेशजवळ पाच रूपये सुट्टे नव्हते. पाचशे रूपयांची नोट असल्याने आपणाकडे सुट्टे पैसे नसल्याचे जितेशने सांगताच वजन-काटा करणारा दुकानदार भडकला. सुट्टे पैसे नव्हते तर वजन का करून घेतलेस. अगोदर तुला हे माहिती नव्हते, असे चढ्या आवाजात बोलू लागला. प्रश्न पाच रूपयांचा आहे. सुट्टे पैसे झाले की तुला ते देतो, असे जितेश वजन-काटावाल्याला समजावून सांगत होता. काही ऐकून न घेता वजन-काट्यावाल्याने शिवीगाळ करत जितेशला झोडपायला सुरूवात केली. वजन-काट्यावाल्याच्या बाजूने एक महिला अन्य दोन जण पुरूष जितेशला मारहाण करण्यास पुढे आले. या चौघांनी मिळून जितेश यांना बेदम मारहाण केली. भाजीच्या क्रेटने जितेशवर हल्ला चढविल्याने त्याला गंभीर दुखापती झाल्या आहेत. बाजारात धंदा कसा करतो, ते मी बघतो, अशी धमकी वजन-काटा दुकानदाराने जितेश जोशी यांना दिली. पोलिसांनी जखमी जितेश जोशी याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
या घटनेमुळे ग्रामीण भागातून कल्याणच्या भाजी बाजारात विक्री करण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांसह भाजी विक्रेत्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. ग्रामीण भागातून कल्याणच्या बाजारात भाजी विक्रीसाठी विक्रेते आले की स्थानिक विक्रेते त्यांना विविध प्रकारे त्रास देतात. काहीतरी कारण काढून बाजारातील प्रस्थापित विक्रेते कल्याण, डोंबिवली, भिवंडी ग्रामीण भागातून आलेल्या किरकोळ विक्रेत्यांना त्रास देत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. पोलिसांनी हे प्रकरण वेळीच रोखावे, अन्यथा एक दिवस या बाजारात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसह भाजी विक्रेत्यांनी व्यक्त केली.