मिरा रोड : भाईंदर पश्चिमेच्या नगरभवन तलावात गणेश उत्सव व नवरात्री उत्सवा दरम्यान शासनाने बंदी घातलेल्या पीओपी मुर्त्यांचे विसर्जन केल्यामुळे पाणी दूषित व हिरवे झाले असुन परिसरात मोठी दुर्गंधी पसरली आहे. परिणामी या दूषित पाण्यामुळे जलचर प्राणी व मासे यांचा मोठया प्रमाणात मृत्यू झाला आहे.
दूषित पाण्यामुळे जलचर प्राणी व मासे यांचा मोठया प्रमाणात मृत्यू झाला आहे. मृत्यु झालेले मासे तलावात तरंगत आहेत. महापालिकेकडून मृत्यु झालेले मासे बाहेर काढून त्याचा ढिगारा घातला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश आणि पर्यावरण विभागाचे आदेश डावलून याकडे दुर्लक्ष केले आहे. याप्रकरणी संबधीतांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पर्यावरण प्रेमी यांनी केली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने व शासनाच्या पर्यावरण विभागाने नैसर्गिक व सार्वजनिक तलावात बंदी असलेल्या पीओपीच्या देवी देवतांच्या मुर्त्या विसर्जित करू नये, त्यासाठी दुसरीकडे कुत्रीम तलाव बांधून त्यामध्ये मुर्त्या विसर्जित कराव्यात व त्याचा मलबा काढून पालिकेने त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावावी असे आदेश आहेत. महापालिकेने या आदेशाचे उल्लंघन करून माती व शाडूच्या मुर्त्यांसोबत सरसकट पीओपी मूर्त्या व त्यासोबत असलेले केमिकल युक्त साहित्य तलावात विसर्जन केले. त्यामुळे तलावातील पाणी दूषित व हिरवेगार झाले असुन मोठया प्रमाणात माशांचा मृत्यु झाला आहे. आजूबाजूच्या परीसरात या दुर्गंधी युक्त पाण्याचा वास सुटला आहे. अशीच परिस्थिती शिवार गार्डन ईतर परीसरात देखील झाल्याचे सांगितले जात आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
अशा पद्धतीने नैसर्गिक तलाव पात्रातल्या माशांचा मृत्यू होत आहे. याप्रकरणी संबंधित पालिकेचे अधिकारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करावी व दोषी असलेल्या पालिका अधिकार्यांवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी पर्यावरण प्रेमी धिरज परब यांनी केली आहे.