ठाणे : ठाणे जिल्ह्यातील सुमारे ४० हजार घरगुती तर २ हजार ५०० सार्वजनिक गणपतींचे आज विसर्जन होणार आहे. विसर्जन मिरवणूकांमध्ये कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी १५ हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे याशिवाय ड्रोन तसेच सिसिटीव्हीचा वॉच देखील ठेवण्यात आला आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थानकडून देखील विसर्जनाची जय्यत तयारी करण्यात आली असून यामध्ये कृत्रिम तलाव, मूर्ती स्वीकृती केंद्र तसेच निर्मल्य स्वीकृती केंद्राची देखील निर्मिती करण्यात आली आहे. लाडक्या बाप्पाची १० दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर आज ठाणे जिल्यात सकाळपासून विसर्जन मिरवणूक निघणार आहेत.
गणेशोत्सवाच्या विसर्जनासाठी जिल्हा, ठाणे महापालिका आणि पोलिस प्रशासन देखील सज्ज झाले आहे. यंदाच्या विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांकडून बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. विसर्जनाच्या वेळी होणारी गर्दी लक्षात घेता सुरक्षा व्यवस्था पुर्णपणे मजबूत करण्यात आली आहे. जिल्यात ४० हजार ६२३ हुन अधिक घरगुती तर २ हजार ५०० सार्वजनिक गाणे मूर्तीचा विसर्जन होणार आहे.
गणपती विसर्जनाच्या अनुषंगाने ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे हे स्वतः रस्त्यावर उतणार असून पाच परिमंडळातील चार अतिरिक्त पोलिस आयुक्त, ९ डीसीपी, १८ एसीपी तसेच सुमारे १२५ पोलिस निरीक्षकांवर सुरक्षेची कमान सोपविण्यात आली आहे. याशिवाय एसआरपीच्या ५ कंपन्या, १५ हजार पोलीस कर्मचारी, ७०० होमगार्ड आणि एक कंपनी रॅपिड अक्शन फोर्स हे विसर्जनासाठी रस्त्यावर असणार आहेत. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरातील मुख्य नाक्या- नाक्यावर, चौका-चौकात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.