

शहापूर : संतोष दवणे
कोकणात पुन्हा एकदा सोमवारपासून पुन्हा एकदा उष्णतेची लाट आल्याचे पाहायला मिळत आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूरचा पारा 45 अंशावर गेला आहे. ठाणे शहरासह कोकणात ऊ न पावसाचा खेळ सुरू असून वाढत्या तापमानामुळे आंबा काजू पिके धोक्यात आली आहे. बदलापूरच्या जांभळावर, पालघरच्या चिकूवर याचा परिणाम झाल्याचे पाहायला मिळते.
कोकणात सध्या हापूसचा हंगाम सुरू आहे. हापूसची परदेशवारीही सुरू झाली आहे. मात्र वाढत्या उष्णतेमुळे आंब्यावरही परिणाम झाल्याचे दिसत असून कोकणातील राष्ट्रीय मानांकन प्राप्त झालेल्या फळपिकांपैकी आंबा, काजू, फणस, जांभूळ, रतांबा या सर्व पिकांवर वाढत्या उष्णतेचा परिणाम होताना दिसत आहे.
तापलेला सूर्य, पाण्याची टंचाई, ढगाळ वातावरणामुळे वाढलेला उकाडा अशा असह्य परिस्थितीत दिवसेंदिवस वाढच होत असून सोमवारी शहापूर तालुक्यात आतापर्यंतच्या उच्चांकी म्हणजे 45 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. अंगाची लाहीलाही करणार्या या वाढलेल्या उष्णतेमुळे शहरासह शहापूर तालुक्यातील किन्हवली, शेणवे, डोळखांब, चांदगाव, खर्डी, कसारा या महत्त्वाच्या बाजारपेठांत दुपारी शुकशुकाट पाहावयास मिळत आहे.
मार्च अखेरपासूनच तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढे गेला असून त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. ताप, चक्कर येणे, अशक्तपणा, उन्हाळी लागणे अशा आरोग्याच्या तक्रारी घेऊ न येणार्या रुग्णांची संख्या अचानक वाढली असून सरकारी व खासगी दोन्ही दवाखान्यांत दैनंदिन ओपीडीत वाढ झाल्याची माहिती मिळत आहे. सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत घरातून बाहेर पडणे अवघड झाले असून या वेळेत शहापूर तालुक्यातील सर्वच ग्रामीण बाजारपेठा ओस पडू लागल्या आहेत. सोमवारी (दि.7) शहापूर शहरासह किन्हवली, शेणवे, डोळखांब, सोगाव, खर्डी, कसारा, टाकीपठार, चांदगाव परिसरात कमीतकमी 21 अंश ते दुपारी 2 नंतर 46 अंश इतके उच्चांकी तापमान अनुभवण्यास मिळाले. त्यामुळे सर्व मुख्य बाजारपेठांत शुकशुकाट दिसून आला. वाढलेल्या उष्णतेमुळे लिंबू सरबत, लस्सी, ताक, दही, थंड पेये, कलिंगड, काकडी यांची मागणी वाढली असून माणसांसह मोकाट फिरणारे पशूही झाडांच्या सावलीचा आसरा घेताना दिसत आहेत.