Thane News : साकेत येथील कांदळवनांवर बेकायदेशीर भराव

खारफुटीवर भराव टाकण्याचे न थांबवल्यास रुस्तमजी, आकाशगंगा, साकेतमध्ये पुराचा धोका
Illegal mangrove filling Saket
साकेत येथील कांदळवनांवर बेकायदेशीर भरावpudhari photo
Published on
Updated on

ठाणे ः साकेत पोलीस मैदानाच्या बाजूला असणाऱ्या राबोडी भागातील नैसर्गिक नाल्याच्या बाजूच्या कांदळवनांवर खारफुटीवर भराव टाकला जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण कक्षाने हरकत घेवून या जागेवर पोलीस दलाच्या वतीने भराव टाकला जात आहे. राबोडी पोलीस ठाण्यात ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये रीतसर तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र तक्रार दाखल होऊन 15 दिवस उलटून देखील राबोडी पोलीस ठाण्याने प्रथम दर्शनी अहवाल (एफआरआय) दाखल करण्यात आला नाही. सदर भराव टाकण्याचे न थांबवल्यास रुस्तमजी, आकाशगंगा, साकेत भागातील गृहसंकुलांना पुराचा फटका बसण्याची शक्यता आहे.

रुस्तमजी गृहप्रकल्पाच्या जवळ साकेत पोलीस ग्राउंडच्या बाजूने तसेच राबोडीस्थित आकाशगंगा रहिवासी संकुलाच्या पाठीमागील भागातून एक नैसर्गिक नाला पुढे ठाणे खाडीत येऊन मिळतो. येथील सर्व्हे क्रमांक 386 च्या 4 भागातील सुमारे 10 हेक्टर जमिनीच्या 7/12 वर भोगवटादार म्हणून पोलीस आयुक्त ठाणे अशी नोंद आहे. सदर क्षेत्र हे सीआरझेड वर्ग 1 तसेच सीआरझेड वर्ग 1 ब असून नाल्याच्या बाजूने विस्तीर्ण कांदळवन अस्तित्वात आहे.

Illegal mangrove filling Saket
Wada Rural Hospital upgrade : वाडा उपजिल्हा रुग्णालयाचा मार्ग मोकळा

17 नोव्हेंबर 2025 रोजी आकाशगंगा संकुलातील रहिवाश्याना येथील खारफुटीवर भराव टाकला जात असल्याचे निदर्शनास आले असता त्यांनी ठाणे तहसीलदार तसेच राबोडी पोलीस ठाणे यांचेकडे पत्राद्वारे तक्रार दाखल केली, रहिवाशांनी ही बाब ठाणे तालुका कांदळवन समिती सदस्य रोहित जोशी यांना देखील अवगत केले. सदर तक्रारीच्या अनुषंगाने 20 नोव्हेंबर रोजी वन विभागाच्या कांदळवन कक्षाने येथे स्थळ पाहणी केली. त्यानंतरही येथील कांदळवनांवर भरणी थांबत नसल्याचे निदर्शनास आल्याने कांदळवन समिती सदस्य रोहित जोशी यांनी

25 नोव्हेंबर रोजी इमेलद्वारे कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय पाणथळ तक्रार निवारण समितीकडे तक्रार दाखल केली. कोकण विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार नव्याने स्थळ पाहणी करण्यात आली. यावेळी सदस्यांना ऍव्हिसेनिआ मरीना जातीचे अनेक तिवरांचे वृक्ष अर्धवट तुटलेल्या अवस्थेत आढळून आले.

काही तोडलेल्या वृक्षांच्या सुकलेल्या फांद्या तसेच काही जिवंत वृक्ष मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलेले आढळून आले. सदर गंभीर निरीक्षणे नोंदवून वन विभागाच्या कांदळवन कक्षाने सविस्तर अहवाल तयार केला. दोन आठवडे उलटून गेल्यानंतरही भरणी थांबत नसल्याचे पाहून कांदळवन कक्षाकडे कारवाईबाबत विचारणा केली असता त्यांनी सामान्य प्रशासन विभाग, ठाणे पोलीस आयुक्तालय यांनी 18 डिसेंबर 2025 रोजी पत्राद्वारे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सदर जमिनीवर मियावाकि पद्धतीने 18 हजार रोपट्याचे रोपण करण्याबाबत परवानगी मागितली असल्याबाबत अवगत केले.

या सर्व गंभीर प्रकरणाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे विचारणा केली असता त्यांनी आमच्याकडून अशी कोणतीही परवानगी ठाणे पोलिसांना दिली नसल्याचे सांगितले. यासंदर्भात 22 डिसेंबर रोजी ठाणे जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी व उपयुक्त, ठाणे महानारपालिका यांना प्राप्त तक्रारींची शहानिशा करून नियमोचित कारवाई करण्याबाबत कळविले. त्यावर ठाणे महानगरपालिका प्रदूषण नियंत्रण विभागाने 7 जानेवारी 2026 रोजी स्थळपाहणी करून सदर जमिनीवर पोलीस विभागातर्फे भरणी होत असल्याचे स्पष्ट करत 9 जानेवारी रोजी राबोडी पोलीस ठाण्यात ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये रीतसर तक्रार दाखल केली.

Illegal mangrove filling Saket
Tansa dam pipeline project : मोबदला न देताच तानसा धरणातून पाईपलाईन टाकण्याचा घाट

तक्रार दाखल होऊन 15 दिवस उलटूनदेखील राबोडी पोलीस ठाण्याने याबाबत एफआरआय दाखल न केल्याने जोशी यांनी आपल्या वकिलांमार्फत ठाणे पोलीस आयुक्तालयाला कायदेशीर नोटीस बजावली आहे. नोटिशीत पुढील 10 दिवसांत दोषी व्यक्ती / संस्थांवर नियमोचित कायदेशीर कारवाई न केल्यास ठाणे पोलीस आयुक्तालयाविरुद्ध न्यायालयीन प्रक्रियेचा अवलंब करण्यात येईल असे स्पष्ट केले आहे.

पुराचा फटका बसण्याची शक्यता

किनारपट्टी व्यवस्थापन योजना नकाशानुसार सर्व्हे क्रमांक 386 (4 भाग) हा सीआरझेड 1 व सीआरझेड 1 ब श्रेणीत नोंदविला आहे. संबंधित क्षेत्र पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील खारफुटी आणि आंतर-भरती-ओहोटीचा प्रदेश आहे, जिथे भूमी पुनर्संचयन, कचरा टाकणे, बांधकाम आणि नैसर्गिक भूरूपांमध्ये बदल करण्यास, केवळ मर्यादित आणि कायदेशीररित्या मंजूर केलेल्या कामांव्यतिरिक्त, सक्त मनाई आहे. मुंबई उच्च न्यायालयात कांदळवन संरक्षणासाठी दाखल अवमान याचिकेत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रतिज्ञापत्राद्वारे 2005 च्या महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्राच्या नकाशांमध्ये दाखविलेले कांदळवन क्षेत्र वन विभागाला हस्तांतरित केले जाईल.

खारभूमीत जिथे क्षारांचे प्रमाण जास्त असते तिथे तिवर, कांदळ या प्रजाती लाखो वर्षांच्या उत्क्रांतीनंतर जगण्यासाठी अनुरूप बनल्या आहेत, त्यांच्याशिवाय इतर कोणतेही वृक्ष खारभूमीत जगू शकत नाहीत, पोलीस प्रशासनाचे मुख्य काम कायदा व सुव्यवस्था राखणे हे असून हरीत क्षेत्र वाढविण्याची जबाबदारी वन विभाग, महानगरपालिकासारख्या इतर संस्थांची आहे. याच जागेवर 2018 साली ठाणे महानगरपालिका कंत्राटदारावर पाणथळ व कांदळवन क्षेत्रात भराव केल्या प्रकरणी राबोडी पोलीस स्टेशन येथे पर्यावरण संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल आहे. या जागेवरील भराव तातडीने काढून जागा पूर्ववत न केल्यास पावसाळ्यात साकेतसारख्या सखल भूभागातील गृहसंकुलांना पुराचा फटका बसू शकतो, असे पर्यावरण कार्यकर्ता रोहित जोशी यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news