

ठाणे: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील 'मिसिंग लिंक' प्रकल्पाच्या बोगद्याजवळ जुलै महिन्यात झालेल्या दरड दुर्घटनेमागे डोंगरावरील पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बदलणे हे प्रमुख कारण असल्याचे आयआयटी बॉम्बेच्या तांत्रिक अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
या अहवालानुसार भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी डोंगरावरील पाण्याचा प्रवाह वळविणे, सैल दगडांना हाय-टेन्साईल स्टील जाळ्या व रॉक अँकर्सने बांधून ठेवणे, तसेच तीव्र उतारांना टेरेसिंग (बेंचिंग) करून सुरक्षित करणे अशा महत्त्वाच्या उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) या शिफारशी स्वीकारून कामालाही सुरुवात केली आहे.
६ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसानंतर 'मिसिंग लिंक'च्या टनेल क्रमांक २च्या प्रवेशद्वाराजवळ मोठी दरड कोसळली होती. या दुर्घटनेमुळे मुंबईकडे जाणारा मार्ग सुमारे १८ तास बंद ठेवावा लागला होता. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी, १ मे रोजी ६,६९५ कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन झाले होते. त्यामुळे या दुर्घटनेनंतर प्रकल्पाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
एमएसआरडीसीने या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी आयआयटी बॉम्बेकडे अभ्यास सोपविला होता. तज्ज्ञांनी केलेल्या भूवैज्ञानिक पाहणीत डोंगराच्या माथ्यावरून वाहणाऱ्या पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक मार्ग अतिवृष्टीमुळे बदलल्याचे आढळले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी थेट उतारावरून वेगाने खाली आले.
परिणामी डोंगरावरील माती आणि ठिसूळ खडकांचा वरचा थर पाण्याने पूर्णपणे भिजून कमकुवत झाला आणि त्यातून दरड कोसळली. अहवालातील सर्वात महत्त्वाची शिफारस म्हणजे प्रकल्पाच्या सुरक्षेचा निकष बदलण्याची.
आतापर्यंत अशा प्रकल्पांचे नियोजन १०० वर्षांतील अतिवृष्टी गृहीत धरून केले जात होते. मात्र आता हवामान बदलामुळे वाढलेल्या अतिवृष्टीच्या घटनांचा विचार करून १,००० वर्षांतील अतिवृष्टीचा निकष स्वीकारण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यानुसार एका दिवसात १,२४९ मिमी पाऊस झाला तरीही 'मिसिंग लिंक' सुरक्षित राहील, अशा पद्धतीने सुधारित डिझाइन तयार करण्यात आले आहे.
आयआयटी बॉम्बेने भविष्यातील धोका टाळण्यासाठी डोंगरावरील पावसाचे पाणी बोगद्याच्या प्रवेशद्वारापासून दूर सुरक्षित मार्गाने वळविणे, सैल खडकांना हाय-टेन्साईल स्टील वायर मेश आणि रॉक अँकर्सच्या साहाय्याने मजबूत करणे, तसेच तीव्र उतारांना टप्प्याटप्प्याने (टेरेसिंग/बेंचिंग) तयार करून कोसळणारे दगड रस्त्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच रोखण्याची शिफारस केली आहे.
सह्याद्री पर्वतरांगेतील कठीण बेसॉल्ट खडकांवर माती व ठिसूळ खडकांचा थर असल्याने दीर्घकाळ मुसळधार पाऊस झाल्यास हा वरचा थर पाण्याने पूर्णपणे भिजून कमकुवत होतो आणि दरड कोसळण्याचा धोका वाढतो, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
एमएसआरडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आयआयटी बॉम्बेचा अहवाल स्वीकारल्याची माहिती देत, तातडीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू झाल्याचे सांगितले आहे. तर पावसाचे पाणी वळविणे आणि इतर मोठी संरचनात्मक कामे पावसाळ्यानंतर हाती घेतली जाणार आहेत.