

shops burnt in Chinchpada road fire
डोंबिवली : कल्याण पूर्वेकडे असलेल्या चिंचपाडा रोडवरील मॉडेल कॉलेज परिसरात मंगळवारी रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. रस्त्यालगत असलेल्या भाजी आणि माठ विक्रीसाठी उभारलेल्या टपऱ्यांनी अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दुकानदारांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.
चिंचपाडा रोडवर मॉडेल कॉलेजच्या अगदी जवळ रस्त्याच्या कडेला काही कच्च्या स्वरूपाच्या टपऱ्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने चिकन व भाजी विक्रेत्यांसह इतर छोट्या व्यावसायिकांची दुकाने होती. अचानक एका टपरीतून धूर येऊ लागला आणि काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले. आगीच्या ज्वाळा इतक्या उंच होत्या की लांबूनही धुराचे लोट दिसत होते.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक रहिवाशांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग वेगाने पसरत होती. घटनेची वर्दी मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले आणि आग आजूबाजूच्या परिसरात पसरण्यापासून रोखली.
या आगीत भाजी, मातीची भांडी, रांजण विक्रीसाठी उभारलेल्या टपऱ्या पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त वर्तविण्यात येत आहे. भरवस्तीत आणि मुख्य रस्त्यावर ही घटना घडल्याने काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला होता. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून पोलिस आणि अग्निशमन दल या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.