Thane | ढाबा संस्कृतीच्या नावाखाली कल्याणमध्ये दारूसह हुक्कापार्ट्या

बेकायदा ढाब्यांकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष, तरूण पिढी व्यसनाच्या आहारी
Hookah Parlor Raid
हुक्का पार्लरfile photo

सापाड : कल्याण डोंबिवलीत शहरात खासगी आणि शासकीय मालमत्तेच्या जागेवर अनधिकृत बांधकामे उभारून बेकायदा ढाबे खुलेआम सुरू आहेत. या बेकायदेशीर ढाब्यांना मिळत असणाऱ्या राजाश्रयामुळे ढाब्यावर बेकायदेशीर दारूसह हुक्काच्या पार्ट्या रात्री खूप उशिरा पर्यंत रंगत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर कल्याणातील अनधिकृत ढावे आणि बारवर कारवाईसाठी सुरुवात करण्यात आली आहे. मात्र ही कारवाई तत्काळ मंदावल्याने अनधिकृत ढाब्यांसह बार चालकांचे चांगलेच फावले आहे. त्यामुळे या ढाब्यांवर बेकायदेशीर दारूसह हुक्काच्या पार्ट्या रंगत असून मध्य रात्रीपासून पहाटेपर्यंत कर्णकर्कश आवाजामध्ये डीजे, म्युझिक सिस्टीमच्या माध्यमातून प्रचंड ध्वनिप्रदूषण केले जात आहेत. त्याच बरोबर या अनधिकृत ढाब्यांच्या नावाखाली बेकायदा पद्धतीने मद्यविक्रीसह हुक्का पार्लर चालवले जात आहेत.

त्यामुळे पालिका प्रशासनासह पोलीस प्रशासन निद्रावस्थेत कसे? याचे उत्तर आजही गुलदस्त्यातच असल्यामुळे पालिका प्रशासनासह पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर राज्यात अनधिकृत धाब्यावर पालिका प्रशासनाच्या कारवाईने जोर धरला असला तरीही कल्याण डोंबिवलीत अनधिकृत ढाबे आणि हुक्कापार्लर जोमाने सुरू आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर कल्याण डोंबिवलीत अनधिकृत धाब्यावर कारवाई सुरू झाली खरी, मात्र या कारवाईनंतर तत्काळ पालिका प्रशासनाला अनधिकृत धाब्यावरील कारवाईचा विसर पडला असल्याचे लक्षात येत अनधिकृत ढाब्यावर रात्री उशिरापर्यंत धिंगाणा सुरू असल्यामुळे पालिका आणि पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कल्याण डोंबिवलीत सध्या अनधिकृत बांधकामांचा विषय चांगलाच गाजत आहे. या अनधिकृत बांधकामामध्ये सुरू असलेले ढाबे तरुण पिढीला व्यसनाधिनतेच्या खाईत ढकलण्याचे काम करत आहेत.

धक्कादायक बाब म्हणजे येथे बांधकाम करण्यापूर्वी आवश्यक असलेले बिनशेती (एनए) आदेश, गाव नमुना नंबर, सातबारा उतारा, बांधकामासाठी महापालिकेकडून आवश्यक परवानगी, मद्यविक्री परवाना, हुक्का परवाना, अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र आणि इतर शासकीय विभागाच्या कोणत्याही परवानग्या न घेता बिनदिक्कतपणे हे व्यवसाय चालवले जात आहेत. या अनधिकृत प्रकरणावर प्रशासन निद्रावस्थेत कसे? असे प्रश्न उपस्थित होत असून अनधिकृत ढाबे कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत? याविषयी चर्चांना पालिका वर्तुळात उधाण आले आहे. कल्याण डोंबिवली शहरात सध्या अनधिकृत ढाबे मोठ्या प्रमाणावर उभारताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी सरकारी जमिनीवर अतिक्रमणे का झाली आहेत. बांधकाम परवानग्यांशिवाय बेकायदा अतिक्रमणे करून बहुतांश ठिकाणी अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र, राज्य उत्पादन शुल्क विभागाची परवानगी नसतानाही मद्यविक्री केली जात आहे.

अनधिकृत ढाब्यावर आमची नियमित कारवाई सुरू आहे. मात्र एकदा कारवाई केल्यानंतर ते पुन्हा लाकूड आणि ताडपत्रीच्या साह्याने उभारणी करतात. यापुढे ही कारवाई अतिशय जोमाने केली जाईल.

सोनम देशमुख, सहाय्यक आयुक्त

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news