

डोंबिवली : करदात्यांना अधिकाधिक नागरी सेवा आणि सुविधा ऑनलाईन अर्थात ई-गव्हर्नन्स प्रणालीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेला प्रशासकीय सेवेबद्दल स्काॅच संस्थेतर्फे महानगरपालिका सुवर्ण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. ही घटना ताजी असतानाच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या पाचव्या ग्रीन उर्जा व उर्जा संवर्धन पुरस्काराने केडीएमसीला गौरविण्यात आले आहे.
आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेने उर्जा संवर्धन व सौर उर्जा क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. त्याबद्दल मंगळवारी (दि.25) नवी दिल्लीतील डिझायर हॉल, ली मेरीडीयन येथे संपन्न झालेल्या 13 व्या ग्रीन एनर्जी समितीमध्ये इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेला पाचवा ग्रीन उर्जा व उर्जा संवर्धन पुरस्कार देऊन सन्मानित केले.
देश स्तरावर सौर उर्जा क्षेत्रात व महापालिकेच्या विविध विभागात उर्जा संवर्धन क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीची दखल घेऊन संपूर्ण देशातून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची निवड केली. महानगरपालिकेच्यावतीने विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी हा पुरस्कार स्विकारला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने सन 2007 पासून महापालिका क्षेत्रातील नविन इमारतींवर सौर उर्जा सयंत्रे आस्थापित करणे विकासकांना बंधनकारक केले आहे. त्यासाठी महापालिकेच्या विद्युत विभागाने प्रभावी यंत्रणा तयार करून तशी अंमलबजावणी देखील केली आहे. सन 2007 ते 2021 या कालावधीत एकूण 1832 इमारतींवर 1 कोटी 8 लक्ष लीटर्स प्रती दिन क्षमतेची सौर उष्ण जल सयंत्रे विकासकांकडून आस्थापित केली आहेत. त्यामुळे इमारतींमध्ये गिझरचा वापर न होता प्रती वर्षी 18 कोटी वीज युनिटची बचत होत आहे. सन 2021 पासून महानगरपालिकेने विकासकांना रुफ टॉप नेट मीटर सौर उर्जा निर्मिती करणारे प्रकल्प आस्थापित करणे बंधनकारक केले असून आजपर्यंत 197 इमारतींवर 3.6 मेगा वॅट क्षमतेचे रुफ टॉप नेट मीटर सौर उर्जा निर्मिती करणारे प्रकल्प विकासकाकडून आस्थापित करुन घेतल्याने प्रती वर्ष 52 लक्ष विज युनिट सौर उर्जा निर्मिती होत आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या 10 प्रभाग क्षेत्र कार्यालयांसाठी एकूण 160 किलो वॅट क्षमतेची सौर उर्जा निर्मिती करणारी सयंत्रे कार्यान्वित केलेली आहेत. महापालिकेच्या मोहिली येथील जलशुध्दीकरण प्रकल्प व कपोते वाहनतळ येथे प्रत्येकी 120 किलो वॅट क्षमतेची सौर उर्जा निर्मिती करणारी सयंत्रे आस्थापित करण्यात आलेली आहेत. महापालिकेच्या 15 इमारतींवर 0.44 मेगा वॅट क्षमतेची सौर उर्जा सयंत्रे आस्थापित असून प्रतिवर्षी 6.34 लक्ष सौर उर्जा युनिट उत्पादन होत आहे.
उर्जा संवर्धन क्षेत्रात महानगरपालिकेने निधी व स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहरातील जुने परंपरागत सोडीयम दिवे काढून उर्जा बचत करणारे एलईडीचे पथदिवे बसविले आहेत. उर्जा संवर्धन क्षेत्रात महापालिकेच्या शहरांतील दोन्ही रंगमंदिरात असलेले परंपरागत चिलर काढून उर्जा कार्यक्षम व उर्जा बचत करणारे चिलर व महापालिका कार्यालयांमध्ये उर्जा बचत करणारे 28 वॅट क्षमतेचे सिलींग फॅन व एलईडी लाईट्स बसवून उर्जा संवर्धन क्षेत्रात सुध्दा भरीव कामगिरी केली आहे.
उर्जा संवर्धन व सौर उर्जा वापर याबाबत महानगरपालिकेने शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये, मॅरेथॉन स्पर्धेतील स्पर्धक व नागरीकांमध्ये वेगवेगळ्या महोत्सवामध्ये व मोठया रहीवासी सोसायटी येथे पथनाट्य व उर्जा संवर्धन गीतच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली शहरातील नागरीकांमध्ये मोठ्या प्रमणात जनजागृती केली आहे. या साऱ्याची दखल घेऊन ग्रीन एनर्जी समितीमध्ये इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेला पाचवा ग्रीन उर्जा व उर्जा संवर्धन पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
प्रशांत भागवत. विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता, कल्याण-डोंबिवली , ठाणे