

ठाणे : शीळ भागातील 21 अनधिकृत इमारतींवर कारवाई करण्यासाठी ठाणे महापालिकेला भाग पडणार्या उच्च न्यायालयाने महापालिकेला पुन्हा एकदा दणका दिला आहे. त्यानंतर आता मुंब्रा शीळ भागातील 11 अनधिकृत इमारतींवर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले असल्याने आता या इमारतींवर कारवाई करण्यासाठी पालिकेची धावपळ सुरु झाली आहे. यातील दोन इमारती गुरुवारी महापालिकेने जमीनदोस्त केल्या असून शुक्रवारी एका इमारतीवर महापालिकेने हातोडा टाकला आहे. यासंदर्भात टाकण्यात आलेल्या तीन याचिका एकत्र करून न्यायालयाने कारवाईचे आदेश दिले आहेत.
अनधिकृत इमारतींवर कारवाई करण्यासाठी उच्च न्यायालयाचा आदेश येईपर्यंत वाट बघणार्या ठाणे महापालिकेने शीळ परिसरातील 21 इमारतींवर कारवाई केली असली तरी, ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या दोन वर्षात तब्बल 358 अनधिकृत इमारती उभ्या राहिल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक 223 अनधिकृत इमारती या एकट्या दिव्यात उभ्या राहिल्या आहेत.
शीळ भागातील 21 इमारतींवर कारवाई करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर ठाणे महापालिकेने या 21 इमारतींवर कारवाई करून या सर्व अनधिकृत इमारती जमीनदोस्त केल्या आहेत. त्यानंतर शीळ परिसरातच असलेल्या अनधिकृत बांधकामांवर दोन स्वतंत्र याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या असून यामध्ये एका याचिकेवर सुनावणी देताना 10 इमारती तर दुसर्या याचिकेवर सुनावणी देताना 1 एका इमारतीवर अशा 11 अनधिकृत इमारतींवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
एरवी अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष करणार्या ठाणे महापालिकेची उच्च न्यायालयाच्या या दणक्यांनंतर चांगलीच भंबेरी उडाली असून या 11 अनधिकृत इमारतींवर तत्काळ गुरुवारपासून कारवाईला सुरुवात केली आहे. गुरुवारपासून सुरु केलेल्या कारवाईमध्ये 11 अनधिकृत इमारतींपैकी गुरुवारी दोन इमारतींवर कारवाई केली.
उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश आणि प्रभाग समितीच्या बीट निरीक्षकांनी केलेल्या पाहणीत आढळलेल्या 151 अनधिकृत बांधकामांवर महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने आतापर्यंत कारवाई केली आहे.
19 जूनपासून नियमितपणे ही कारवाई सुरू असून त्यात शीळ येथील एम के कम्पाऊंडमधील 21 इमारतींच्या पाडकामांचाही समावेश आहे. या 151 अनधिकृत बांधकामांपैकी 117 बांधकामे पूर्णपणे निष्कासित करण्यात आली आहेत. तर, 34 बांधकामांमधील अनधिकृत वाढीव बांधकाम हटवण्यात आल्याची माहिती उपायुक्त (अतिक्रमण विभाग) शंकर पाटोळे यांनी दिली. महापालिका क्षेत्रात अनधिकृत चाळी, अनधिकृत बैठी बांधकामे, वाढीव शेड, वाढीव बांधकाम, प्लिथंचे बांधकाम, अनधिकृत टर्फ या प्रकारच्या बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई नियमितपणे सुरू राहणार असल्याचे उपायुक्त पाटोळे म्हणाले.