

नेवाळी : महामार्गावर बंदी असताना देखील वाहतूक पोलिसांनी अवजड वाहनांना दिलेली सूट थोडक्यात नागरिकांचे जीव वाचवून गेली आहे. खोणी-तळोजा महामार्गावरील खोणी पलावा गेट 4 पासून चिरड फाटा दरम्यान मोठं मोठ्या वाहनांना ट्रेलने धडक दिली आहे. या धडकेत शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्या बसेस सह खासगी कंपन्यांच्या बस आणि दुचाकीस्वारांचे देखील अपघात झाले आहेत. या अपघाताच्या प्रकाराची माहिती मिळताच तातडीने मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिन्ही अवजड वाहनांच्या चालकांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
खोणी-तळोजा महामार्गावर सकाळच्या सुमारास चाकरमान्यांची औद्योगिक क्षेत्रात ये जा मोठ्या प्रमाणात सुरु असते. अश्या कालखंडात वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे तींन अवजड ट्रेलर महामार्गावर धावत होते. त्यांचा आकार मोठा असल्याने बाजूने जाणार्या वाहनांना त्यांची धडक बसत होती. यामध्ये टेम्पो, बसेस यांसह दुचाकी स्वारांचे देखील अपघात झाले आहेत.
कल्याण-शीळ रस्ता पार करून हे ट्रेलर खोणी-तळोजा महामार्गावरून जेएनपीटीच्या दिशेनं जाणार होती. मात्र या वाहनांनी अपघात करून अन्य वाहनचालकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. अपघाताच्या घटना घडल्यानंतर स्थानिकांनी वाहतूक पोलिसांच्या विरोधात संताप व्यक्त करायला सुरुवात केली होती. त्यामुळे थेट कॅमेर्यासमोर वाहनचालकाने वाहतूक ट्रॅफीक वार्डनने गुगलपेच्या सहाय्याने पैसे घेल्याची कबुली दिली आहे.
या कबुली दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून वाहतूक विभागाचे उपायुक्त संजय शिरसाट यांनी प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे. तातडीने वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून प्रकरणाची चौकशी देखील सुरु करण्यात आली आहे. मात्र या तिन्ही अवजड ट्रेलर मुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
कल्याण मार्गे निघालेले अवजड ट्रेलर जेएनपीटी येथे मार्गस्त होत होते. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ते डोंबिवलीत होते. त्यानंतर त्या परिसरात वाहतूक पोलिसांनी अडविल्यानंतर त्यांना खोणी-तळोजा महामार्ग पार करण्यास वेळ लागला होता. दरम्यान या ट्रेलवरील जॅक मोठ्या आकाराचे असल्याने बाजूने जाणार्या वाहनांना सहज धडक देत होते.
यामध्ये मोठ्या बसेस सह टेम्पोचे नुकसान झाले आहे. यानंतर मानपाडा पोलिसांनी तिन्ही वाहनचालकांवर गुन्हे दाखल केले असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई वाहतूक पोलिसांनी केली आहे. मात्र महामार्गावर घडलेल्या घटनेनंतर तरी वाहतूक पोलीस अवजड वाहनांचा प्रश्न गांभीर्याने घेणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
वाहनांना धडक दिल्यानंतर वाहनचालक पसार
वाहनांना धडक दिल्यानंतर वाहनचालकाने वाहन सोडून पलायन केले होते. त्यानंतर मोठ्या प्रमाणात महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. चिरड गावापासून ते खोणी फाट्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यानंतर तातडीने वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतुक कोंडीवर नियंत्रण मिळवले. मात्र आठवड्याच्या पहिल्याच दिवशी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने कामगारवर्गाला सोमवारीच लेटमार्कचा सामना करावा लागला आहे.