पालघर : पालघर जिल्ह्यात 12 ते 15 जुलै दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. जुलै महिन्यात सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने 1 जुलै रोजी वर्तविला होता.
पुढील तीन दिवस वार्याचा वेगात वाढ होवून 15 ते 20 किलोमीटर प्रति तास राहण्याची शक्यता आहे.
महावेधच्या आकडेवारीनुसार पालघर जिल्ह्याचे 1 जून ते 11 जुलैपर्यंत सरासरी पाऊस 733.0 मिमी आहे. यावर्षी 660.7 मिमी (90.1%) पावसाची नोंद झाली आहे.
11 जुलैपर्यंत जव्हार 523.2 (63.6%) व मोखाडा 458.3 (68.2%) तालुक्यात सर्वात कमी पाऊस झाला आहे.
वसई (782.6 मिमी), वाडा (713.1 मिमी)
डहाणू (596.6मिमी), पालघर (700.5 मिमी)
विक्रमगड (697.1 मिमी), तलासरी (538.1 मिमी)
पावसाची नोंद झाल्याची माहिती कोसबाड कृषी विज्ञान केंद्राचे कृषी हवामान शास्त्रज्ञ् रिझवाना सय्यद यांनी दिली.
मुसळधार पावसासोबत जोरदार वार्याची शक्यता असल्याने शेतकर्यांनी नवीन लागवड केलेली फळांची झाडे तुटून पडू नयेत म्हणून नवीन झाडांना काठीचा आधार देवून बांधावे. तसेच भात लागवड झाली असल्यास भात शेतातील अतिरिक्त साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी खोल चर करून घ्यावे. जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेता शेतकर्यांनी औषध फवारणी व खते देण्याची कामे पुढे ढकलावीत, भाताची पुनर्लागवड,फळझाडे व भाजीपाल्याची नवीन लागवड करणे टाळावे. जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था करावी. कुक्कुटपालनाच्या ठिकाणी हवामान उबदार राहण्यासाठी विजेचे बल्ब लावण्याची व्यवस्था करावी, असा सल्ला कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. विलास जाधव यांनी दिला आहे.