

ठाणे : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ठाणे शहरात विविध दुर्घटनांची मालिका सुरू असून, मंगळवारी मुंब्र्यात इमारतीच्या बाल्कनीचा स्लॅब कोसळणे, नौपाड्यात जमीन खचणे, वागळे इस्टेटमध्ये संरक्षण भिंत कोसळणे आणि दोन वाहनांवर झाड व झाडाची फांदी पडणे अशा घटना घडल्या. सुदैवाने सर्व घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी शहरातील अनेक इमारती व परिसरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मुंब्रा येथील अमृतनगर परिसरातील जाफरान शॉपच्या मागे, एमटीएनएल कंपाऊंडमधील हिना कॉटेज (तळमजला अधिक दोन मजले) या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील बाल्कनीचा स्लॅब मंगळवारी रात्री अचानक कोसळला. रात्री ८.२८ वाजण्याच्या सुमारास या घटनेची माहिती महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळाली.
घटनेनंतर अग्निशमन दल, बांधकाम विभाग आणि मुंब्रा प्रभाग समितीचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पाहणीनंतर उर्वरित इमारतही धोकादायक स्थितीत असल्याचे आढळून आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून इमारतीतील चार कुटुंबांना तातडीने बाहेर काढून नातेवाईकांकडे तात्पुरते स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच परिसराला धोकापट्टी लावून सुरक्षित करण्यात आले.
दरम्यान, नौपाडा परिसरात बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यामुळे मनिषा बिल्डिंगलगतची जमीन खचली. यामुळे संरक्षण भिंत आणि लोखंडी पत्रे धोकादायक स्थितीत आली. तर वागळे इस्टेट येथील टीएमटी बस डेपोची संरक्षण भिंत कोसळल्याची घटना घडली. दोन्ही घटनांची माहिती मिळताच महापालिकेचे बांधकाम विभाग, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि संबंधित प्रभाग समित्यांचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. धोकादायक पत्रे हटविण्याबरोबरच टीएमटी डेपो परिसरातील मलबा जेसीबीच्या सहाय्याने हटविण्यात आला. या दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
पावसामुळे शहरातील वृक्ष दुर्घटनांमध्येही वाढ झाली आहे. मंगळवारी कळवा येथील पारसिक नगरमधील ललिता अपार्टमेंटच्या आवारात उभ्या असलेल्या टाटा पंच कारवर झाड कोसळले. तर बुधवारी सकाळी नौपाड्यातील हरी निवास सर्कल परिसरात पार्क केलेल्या मारुती सुझुकी बलेनो कारवर झाडाची फांदी पडली. दोन्ही घटनांमध्ये वाहनांचे नुकसान झाले असले, तरी कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दल, वृक्ष प्राधिकरण विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकांनी तातडीने झाड व फांदी हटवून परिसर सुरक्षित केला.
चार कुटुंबाचे स्थलांतर
मुंब्रा अमृत नगर परिसरातील हिना कॉटेज या तळ अधिक दोन मजल्याच्या इमारतीच्या बाल्कनीचा भाग कोसळण्याची घटना मंगळवारी रात्री मुसळधार पाऊसात झाली. या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र इमारतीत राहणाऱ्या चार कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आल्याची माहिती ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. आपत्ती व्यवस्थापन कक्षाला रात्री ८.२८ वाजता घटना घडली.
अमृतनगर येथील जाफरान शॉपच्या मागे, एमटीएनएल कंपाऊंड परिसरातील हिना कॉटेज या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील बाल्कनीचा स्लॅब अचानक कोसळला. पाहणीनंतर उर्वरित इमारतही धोकादायक स्थितीत असल्याचे आढळून आले. घटनास्थळी अग्निशमन दल, बांधकाम विभागाचे अधिकारी मुंब्रा प्रभाग समितीच्या आपत्ती पथकाने घटनास्थळी धाव घेतली. इमारतीतील चारही कुटुंबांना बाहेर काढून नातेवाईकांकडे तात्पुरते स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
महामार्गावर प्रचंड वाहतूककोंडी...
मुंबई नाशिक महामार्ग, मुंब्रा बाह्यवळण रस्ता,शिळफाटा, एमआयडीसी-महापे रोड तसेच कशेळे काल्हेर अशा तिन्ही मार्गावर बुधवारी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली.त्यामुळे सकाळी कामानिमित्त निघालेल्या नोकरदार वर्गाचे चांगलेच हाल झाले. अनेक वाहन चालकांना तीन तीन तास या वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडावे लागले.
१४ ठिकाणी साचले पाणी
शहरातील ईस्टन एक्सप्रेस हायवे, न्यु आनंद भवन सोसायटी, कोपरी पूर्व, वागळे फायर ब्रिगेड जवळ, लिलाताई चाळ दिवा, पारसिक रेती बंदर, इंटरनिटी मॉल जवळ, श्रीलंका रोड कौसा, मुंब्रा रशीद कंपाऊड, एम एम सीटी शिळफाटा, देवधर हॉस्पीटल जवळ नौपाडा, बीआर नगर दिवा आगासन रोड, कृष्णा टॉवर सोसायटी कापुरबावडी, भारत गिअर जवळ आणि आर के बाजार दिवा या भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्या.