

ठाणे : घोडबंदर महामार्गावरील सेवा रस्ते जोडणीची कामे जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत 31 डिसेंबर पर्यंत अवजड वाहनांना रात्री 12 पर्यंत बंदी घालण्यात यावी असे आदेश राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले होते. मात्र घोडबंदर मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालणे शक्य नसल्याचे वाहतूक विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
अवजड वाहनांना बंदी घालून या वाहनांना पर्यायी मार्ग नसल्याचे या विभागाचे म्हणणे आहे. तर भिवंडीमध्येही या वाहनांना विरोध होत असल्याने परिवहन मंत्र्यांनी दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी करणे अशक्य असल्याने दररोजच्या वाहतूक कोंडीतून ठाणेकरांची सुटका नाहीच यानिमित्ताने समोर आले आहे.
घोडबंदर मार्गावरील प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी प्रताप सरनाईक यांनी ठाणे महापालिकेत नुकतीच एक महत्वाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला एमएमआरडीए, ठाणे महापालिका आणि वाहतूक विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते. ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पालघर आणि गुजरात भागातील वाहतुकीसाठी घोडबंदर हा मार्ग महत्वाचा मानला जातो. या मार्गावरून अवजड वाहनांसह स्थानिक रहिवाशांच्या वाहने याच मार्गावरून प्रवास करतात.
या मार्गावर मुख्य आणि सेवा रस्ता जोडणी, तसेच मेट्रो प्रकल्पाचे काम अशी एकाच वेळी कामे सुरू असल्याने महामार्ग मार्ग अरुंद झाला आहे. त्यामुळे या मार्गावर दररोज वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच गायमुख रस्त्याची दुरावस्था आणि डोंगर भागातून वाहून येणारे पावसाचे पाणी यामुळे कोंडीत भर पडत आहे.
या कोंडीमुळे नागरिक हैराण झाले असून ही कोंडी सोडविण्यासाठी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सेवा रस्ते जोडणीची कामे 31 डिसेंबर पर्यंत करून तोपर्यंत घोडबंदर मार्गावर सर्व अवजड वाहनांना बंदी घालण्यात घालण्याचे आदेश सरनाईक यांनी दिले होते . तशाप्रकारे परिपत्रक काढण्याचे निर्देशही त्यांनी वाहतूक उपआयुक्त पंकज शिरसाठ यांना दिले होते.
सकाळच्या वेळेस घोडबंदरवर अवजड वाहनांना बंदी घातल्यानंतर आधीच वाहतूक कोंडीने त्रस्त असलेल्या भिवंडीमध्ये आणखीच वाहतूक कोंडी वाढल्याने याचाही विरोध करण्यात आला. तर दुसरीकडे भिवंडीत अवजड वाहनांना कायमस्वरुपी बंदी घालण्यात आली आहे.