

ठाणे : दररोजच्या वाहतूक कोंडीवरून संतापलेल्या घोडबंदरच्या रहिवाशांचा अखेर मंगळवारी संतापाचा बांध फुटला. वारंवार पत्रव्यवहार आणि निवेदने देऊनही परिस्थितीमध्ये काहीच फरक पडत नसल्याने अखेर मंगळवारी नागला बंदरकडून ठाण्याकडे येणार्या गाड्या नागला बंदर या ठिकाणी रास्ता रोको करत अडवण्यात आल्या. या आंदोलनामुळे मंगळवारी पुन्हा या महामार्गावर काही काळ वाहतूककोंडी झाली होती.
खड्डे, दररोजची होणारी वाहतूककोंडी आणि अवजड वाहनांमुळे रस्त्याची झालेली बिकट अवस्था अशा अनेक कारणांमुळे ठाणेकर अक्षरश हैराण झाला आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी घोडबंदरवासीयांनी यापूर्वी देखील आंदोलन करण्यात आले होते. जस्टीस फॉर घोडबंदर या संस्थेच्या वतीने शांततेने हे आंदोलन करण्यात आले होते. मात्र त्यानंतरही वाहतूक कोंडीमध्ये जराही फरक पडला नाही. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी मंगळवारी देखील थेट रास्ता रोको करत प्रशासनाच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करत हे आंदोलन केले.
घोडबंदर महामार्ग हा मृत्यूचा मार्ग म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. या मार्गावरील माजिवडा ते गायमुख पर्यंत दिवसातून एकतरी अपघात होत आहे. या अपघातात अनेक जणांचा मृत्यू तर अनेक वाहनचालक जखमी होत आहेत. या मार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे असून मेट्रो मार्गिकेचे काम सुरू असल्याने कोंडीचा सामना करावा लागत आहे. दररोजच्या या त्रासाला घोडबंदरवासीय मेटाकुटीला आला असल्याने जस्टीस फॉर घोडबंदर रोड या संस्थेने आंदोलनाचे शस्त्र उपसले आहे.
या आहेत प्रमुख मागण्या
जड वाहनांच्या वेळापत्रकाचे काटेकोर पालन करणे. कायमस्वरूपी खड्डे दुरुस्ती करणे. ट्रक टर्मिनल उभारणे. गायमुख घाट रस्ता सुधारणा करणे.