

कसारा : शहापूर तालुक्यातील 110 ग्रामपंचायत असून दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या आदिवासी पाड्यातील घरकुल योजनेचा घरकुलासाठी मंजूर निधीचा दुसरा हफ्ता पाच महिने उलटून देखील जमा न झाल्यामुळे पावसाळ्यापूर्वी नवीन वास्तूत प्रवेश करण्याचे कुटुंबाचे स्वप्न अधुरे राहणार आहे.
शहापूर तालुक्यातील अनेक आदिवासी कुटुंबाना प्रधानमंत्री आवास योजना व शबरी घरकुल योजने अंतर्गत घरकुलासाठी 1 लाख 20 हजार रुपये अर्थसाहाय्य मंजूर झाले होते. साधारण पाच महिन्यापूर्वी काही लोकांना 15,000 रुपयांचा पहिला हफ्ता मिळाला होता. त्यामुळे या रकमेत घराच्या कामाला सुरवात करण्यात आली होती. घराचे अर्धवट काम झाल्यावर उर्वरित कामासाठी पहिला व दुसरा हफ्ता मिळावा यासाठी तालुक्यातील अनेक कुटुंब पाच महिने कार्यालयात फेऱ्या मारत आहेत. परंतु तेथील अधिकारी उडवाउडवीची उत्तर देत आहेत.
वाढत्या महागाईमुळे बांधकामासाठी लागणारे साहित्य किंमती देखील गगनाला भिडत आहेत. त्यामुळे दुसरा हफ्ता मिळण्यासाठी होत असलेला उशीर यामुळे घराचे बजेट आवाक्याबाहेर जाणार आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाची हजेरी असते. त्या अगोदर अर्धवट राहिलेले घराचे बांधकाम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून नवीन वास्तुत प्रवेश करण्याचे स्वप्नावर विभागाच्या दिरंगाईने पाणी फेरले आहे. दरम्यान या प्रकरणी संबंधित अधिकाऱी अरुण विशे यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी त्यांचे मोबाईल फोन बंद करून ठेवल्याने लाभार्थी हवाल दिल झाले आहेत.
दरम्यान घरकुल मंजूर झाल्या नंतर विहिगाव ,माळ परिसरातील काही लाभार्थ्यांना पहिला हप्ता देखील न आल्याने पावसाळ्याच्या तोंडावर घरकुल उभे राहील का नाही असा प्रश्न लोकांना पडला आहे..