नवी मुंबई : ठाणे-बेलापूर मार्गाला वाशीकडून ठाण्याकडे जाणार्या मार्गावर महापे येथून कोपरखैरणेला जोडणार्या उड्डाणपुलाची मार्गिका बनवण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेने निविदाही काढली असून याला दोन ठेकेदारांनी प्रतिसाद दिला आहे. या ठेकेदारांची पात्रता सिध्द झाल्यानंतर या उड्डाणपुलाची मार्गिका बनण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
महापालिका या उड्डाणपुलासाठी सुमारे 24 कोटी रुपये खर्च करणार आहे. या उड्डाणपुलाची लांबी ही 431 मीटरची असणार आहे. हा उड्डाणपुल झाल्यांनतर कोपरखैरणे येथील भुयारी मार्गातून होणारी वाहतूक कोंडी संपुष्टात येणार आहे.
ठाणे -बेलापूर मार्गाच्या समांतर ट्रान्स हार्बर मार्ग असून पुर्वेला एमआयडीसी व पश्चिमेला सिडको वसाहत आहे. पुर्वेकडे असणार्या ठाणे -बेलापूर मार्गावरुन सिडको वसाहतीकडे जाण्यासाठी उड्डणपुल तसेच भुयारी मार्ग बांधण्यात आलेले आहे. पण कोपरखैरणे येथे जाण्यासाठी भुयारी मार्ग बांधण्यात आलेला नाही. तसेच या भुयारी मार्गातून बसेस तसेच अवजड वाहने जात नाहीत. त्यामुळे एकच मार्गिका असल्यामुळे येथे वाहतूक कोंडी होते.
कोपरखैरणेकडे जाण्यासाठी वाहनचालकांना कोपरी वरुन किंवा घणसोली येथील मार्गावरुन 5 ते 6 किमीचा द्रविडी प्राणायम करुन जावे लागते. अन्यथा महापे येथील उड्डणपुलावरुन द्रविडी प्राणायम करत जावे लागते. यामुळे वाहनचालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
कोपरखैरणे वरुन महापे येथील उड्डाणपुलाला मार्गिका जोडल्यांनतर महापे, कोपरखैरणे व घणसोली येथील वाहतूक कोंडी सुटेल. तसेच भविष्यामध्ये ऐरोली घणसोली उन्नत मार्गाकडे जाणार्या वाहनांनाही या मार्गिकेचा लाभ होईल. या उड्डाणपुलाची लांबी ही 431 मीटर असणार असून रुंदी 8.50 मीटर इतकी असेल.
महापे उड्डाणपुलाला कोपखैरणे कडून जोडण्यासाठी मार्गिका करण्यात येणार आहे. त्याच धर्तीवर घणसोली व कोपरखैरणे येथून महापे उड्डाणपुलाकडे येणारी वाहने उतरण्यासाठीही मार्गिका करण्यात यावी, अशी मागणी वाहन चालकांकडून करण्यात येत आहे. सद्यस्थितीत महापे उड्डाणपुलावरुन उतरवण्यासाठी मार्गिका नसल्यामुळे एमआयडीसी मधील रसत्यावरुन पुन्हा युटर्न घेऊन ठाणे -बेलापूर मार्गावर वाहनचालकांना यावे लागते. यामध्ये जवळपास दोन किलोमीटर वळसा घालावा लागत असल्यामुळे वाहनचालकांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
कोपरखैरणेवरुन महापे उडडणपुलाच्या मार्गिकेला जोडण्यासाठी असणार्या मार्गिकेची निविदा काढली असून त्याला दोन कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला आहे. त्यांची पात्रता बघण्यात येणार असून त्यानंतर निविदा उघडण्यात येईल. पात्र ठेकेदाराला काम देण्यात येणार असून या मार्गिकेमुळे कोपरखैरणे येथील वाहतूक कोंडी सुटणार आहे.
शिरीष आरदवाड, शहर अंभियता, नमुंमपा