

ठाणे : महाराष्ट्र सरकारने मद्यावरील मूल्यवर्धित करामध्ये वाढ केल्याने मद्याच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे यंदाच्या गटारीवर महागाईचे सावट आले आहे. मद्याच्या दरासह मटन, चिकनच्या दरात देखील वाढ करण्यात आली आहे.
महागाईची ऐसी की तैसी करत तळीरामांनी गटारी साजरी करण्याची जोरदार तयारी सुरू केल्याचे चित्र दिसून येत आहे. ठाण्यात यंदा गटारीच्या निमित्ताने 38 लाख लीटर देशी मद्य तसेच 35 लाख लीटर विदेशी मद्य एका आठवड्यात विक्री होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर मागील वर्षीच्या तुलनेत 15 टक्के अधिक मद्य विक्री यावर्षी होण्याची शक्यता असल्याची माहिती मद्य विक्रेत्यांनी दिली.
श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी येणार्या गटारी अमावस्या सेलिब्रेट करण्याचा फीवर तळीरामांमध्ये शिगेला पोहोेेचला आहे. बहुतांश कुटुंबांत श्रावण शुद्ध प्रतिपदेपासून गणेश चतुर्थीपर्यंत मांसमटणाला स्पर्श केला जात नाही. त्यामुळे गटारीच्या दिवशी मच्छी, मटण व चिकनवर ताव मारला जातो. गुरुवारपासून (दि.24) श्रावण महिना सुरू होत असला तरी सोमवार, मंगळवारी मांसाहार केला जात नसल्याने बुधवारी (दि.23 ) गटारी सेलिब्रेशनचा रंग चढणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाणेतील येऊर, घोडबंदर रोड, कल्याण शीळ फाटा सह शहरातील सर्वच बार, हॉटेल व धाब्यांवर गटारीची जोरदार पूर्वतयारी केली आहे.
यंदा गटारीवर महागाईचे सावट आहे. मागील वर्षीच्या तुलनेत देशी-विदेशी मद्याच्या किमतीत 5 टक्के वाढ केलीआहे. तर चिकन व मटनच्या दरातही वाढ केली आहे. असे असले तरी या आठवड्यात गटारी असल्याने सुमारे 80 लाख लीटर एकूण मद्य विक्री होण्याची शक्यता उत्पादन शुल्क विभागाच्या सूत्रांनी वर्तवली आहे. मागील वर्षी गटारी असलेल्या आठवड्यात 72 लाख लीटर बियर, 28.32 लाख लीटर विदेशी तर 31 लाख लीटर देशी मद्याची विक्री झाली होती. दरम्यान, गटारीच्या पार्श्वभूमीवर कुठेही कायदा सुव्यवस्था बाधित होऊ नये यासाठी पोलीस दलानेही जय्यत तयारी सुरू केली आहे. दारू पिऊन वाहन चालवणार्यांवर गटारीच्या रात्री पोलिसांची करडी नजर राहणार आहे. शहरातील प्रमुख नाक्यांवर श्वासविश्लेषक यंत्राद्वारे पोलिसांची पथके तैनात करण्यात येणार आहेत.
सर्वच शहरांमधील विविध नाक्यानाक्यांवर वाहतूक पोलिसांचे पथक फिरणार असून हे पथक श्वास विश्लेषक यंत्राद्वारे मद्यपी चालकांची तपासणी करणार आहे. याशिवाय, येऊरच्या पायथ्याशी वाहतूक पोलिसांचा कडक बंदोबस्त राहणार असून तिथे चालकांची तपासणी करणार आहे. तसेच मद्यपार्टीनंतर होणारे वाहन अपघात रोखण्यासाठी ठाणे पोलिसांनी मद्यविक्री करणार्या बारमालकांना ग्राहकांच्या वाहनांसाठी चालकाची व्यवस्था करावी, अन्यथा मद्यविक्री करू नये, अशी तंबी दिली आहे. पोलिसांच्या या तंबी वर हॉटेलमालकांनी अभिनव उपाय शोधून काढला असून गटारीला मनसोक्त पिऊन टल्ली होणार्यासाठी घरपोहोच आणण्यासाठी वाहनांची व्यवस्था अशी स्किमच जाहीर केली आहे.
गटारी नक्कीच साजरी करा, पण अनुचित प्रकार घडेल असे कुठलेही कृत्य करू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. त्याचबरोबर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी मोठी पूर्वतयारी सुरू केली आहे. जिल्हाभरात शहर आणि ग्रामीण पोलीस मिळून साडे सहा हजार पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्त कामी लावला जाणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. गटारीच्या रात्री ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येऊन नियमित गस्त घालण्यात घालण्यात येणार आहे असे देखील पोलिसांनी सांगितले.