Ganesh Chaturthi celebration 2025
ज्योती मुळ्ये
कोकणचं अस्सल कोकणीपण दिसतं ते गणेशचतुर्थीत! कारण आमच्याकडे म्हणजे तळकोकणात गणेश चतुर्थी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. खरं तर हरितालिकेच्या आदला दिवस हा ‘आवरण्याचा’! आता मात्र प्रत्यक्ष बाप्पा घरी येणार असल्यामुळे साधारण पंधरा दिवस आधीपासूनच आम्ही घरा-परसातलं रोंबाट आवरायला घेतो. मुळात आम्ही कोकणी माणसं आतिथ्यशील! त्यात आमच्या लाडक्या ‘बाप्पा’चा पाहुणचार करण्याची ही वर्षभरातली एकमेव पर्वणी! त्यात गणपती आता चार दिवसांवर आलेले असल्यामुळे सरळ आहे, घरागणिक यजमान आणि ‘घरत्या’ कंबर कसून कामाला लागल्यायत.
दोन दिवस पावसाची उघडीप पथ्यावर पडल्याने मोदकासाठी दारचे ताजे नारळ पाडून, सोलून झालेत. घरोघरच्या मंडप्या (माटव्या) घासपूस करायला खळ्यात येऊन पडल्यायत. घरातली तरुण मंडळी या मंडप्या/ माटव्यांचा ताबा घेतायत. पिढ्यान्पिढ्यांची सुख-दुःख, भक्तिभाव, रीतीभाती माळ्यावर पडल्यापडल्या अनुभवणार्या या माटवीवर पाहाता पाहाता चतुर्थीचे रंग चढतील. कळलावी, शेरवाडं, हरणं, कवंडाळं, कांगणं, तेरडे, सुपारीचे शिपटे आणि सगळ्यात शेवटी आंब्याच्या पानासकट नारळ लावून ती सजवली जाईल. सिंधुदुर्गात तर माटवीला केळी, भेंडे, काकड्या लावण्याची पण चाल आहे. यातल्या काकड्या, केळी, नारळ विसर्जनाच्या दिवशी खिरापतीत मिसळून टाकले जातात.
इकडे पाहाल तर, गौरीच्या वड्या- मोदकपिठाची सोवळ्यातली दळणं गिरणीवरून घरात आलीयत. सिंधुदुर्गात एव्हाना करंज्या, चकल्या तळणीत पडल्यायत... आवाठात रव्याच्या लाडवांचा दरवळ सुटलाय... खरं तर गणपतीचा प्रसाद म्हणून फळांचे तुकडे, खिरापत, खव्याचे मोदक, पेढे वाटण्याची रत्नागिरीची पद्धत, पण शहरातली! ग्रामीण भागात मात्र फुटाणे, काकडीचे तुकडे, बुंदीचे खडखड़े लाडूच प्रसाद म्हणून वाटले जातात. चतुर्थीत आमच्याकडल्या ग्रामीण भागात फुगड्यांचे मेळ, जाखड्या, भजनां- कीर्तनांचा जोर फार असतो. बरं, हे कार्यक्रम जवळपास प्रत्येक घरटी असले तरी सगळं आवाठ ते पाहाण्या-ऐकण्यासाठी जमा होतं. त्यामुळे त्यांना वाटण्यासाठी (रिफ्रेशमेंट) म्हणून या काळात बुंदीच्या खडखड्या लाडवाना नि पोह्यांना (फॉव) भरपूर मागणी! सिंधुदुर्गात मात्र रात्रीच्या भजनाला करंज्या आणि उसळ असा फक्कड़ बेत असतो.
घरोघरच्या भजनाना फिरून जास्तीत जास्त करंज्या लंपास करणार्या बहाद्दरांची यावेळी चंगळ असते. लाह्या, शेंगदाणे, काजुगर, खोबरं आणि गुळ घातलेलं ‘पंचखाद्य’ हा खास चतुर्थीसाठी सिंधुदुर्गात हातावर टेकवला जाणारा ‘हटके’ प्रसाद! चतुर्थीच्या निमित्ताने इकडे दिवाळीसारखाच किंबहुना त्याहीपेक्षा अधिक असा लाडू, करंज्या, चकल्यांचा थाट उड़वून दिला जातो. कोकणातल्या गणपतीच्या दिवसात चाकरमान्यांसकट कुठलाही गावकरी गावातल्या कुणाच्याही पडवीत बसून, ‘वयनी चाय टाका ओ वायच’ अशी किंवा ‘कारभारणी चाय टाक गे’ अशी खुश्शाल ऑर्डर सोडत हक्काने चहा-फराळ वसूल करताना दिसतो. एरवी ‘वय’वरून (कुंपणावरून) एकमेकांशी कडकडून भांडणार्या गावकार्यांचं ‘मैत्र जीवांचे’ या काळातच पाहायला मिळतं.
आदल्या दिवसापासून चतुर्थी दिवशी सकाळपर्यंत कधीही आमचे गणपती आणले जातात. आवाठातली सगळी पोरंटोरं, म्हातारी-कोतारी मोठ्या उत्साहात ढोल, ताशे, टिमकी हाताला मिळेल ते घेऊन गणपती आणायला मूर्तीशाळेेकडे पळतात. प्रत्येक घराचा गणपती आणणारा माणूस वर्षानुवर्ष ठरलेला असतो. अनेक गावांतून त्याच व्यक्तीला मूर्तिशाळेतून गणपती आणायचा मान मान दिला जातो. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात नाचत गात गणपती घरी आणले जातात. घरच्या सवाष्णीने दारात ओवाळल्यावर पहिल्यांदा माजघरात आणि मग देवघरात देवांची प्रतिष्ठापना होते.
इतके दिवस ‘गणपती’ किंवा ‘चतुर्थी’ येणार असली तरी आता ते ’देव’ असतात. घरातल्या थोरामोठ्या सगळ्यांनी मिळून रात्री जागवून कलाबूत, क्रेपच्या पट्टया, माडाच्या झावळ्या, बाजारातली नकली सजावटीची तोरणं, लोकरीची तोरणं लावून ‘देव’ बसवणार ती खोली सजवलेली असते. गंमत म्हणजे आजच्या चकचकीत नि गुळगुळीत फर्निचरच्या आणि थर्माकोलच्या मखरांच्या युगातही आमच्या कोकणात वर्षानुवर्षांच्या गणपतीच्या टेबलाला रंगीतसंगीत कागद स्पेशली तांदळाच्या खळीने चिकटवून ‘डेकोरेट’ केलं जातं.
केळीच्या पानावर एकवीस मोदकांचा नेवैद्य दाखवताना आम्ही ‘रामेश्वर, ठाणेश्वर, नवलाई, पावणाई, भैरी, गायीचं नि बाहेरचं’ अशी देवा-बामणाची-पितरांची पानं आठवणीनं वाढतो. ऋषीच्या दिवशी कंदमुळाला लागणारी भाजी बाजारातून नाही तर आमच्याच परसदारातून येते हे कोकणाचं विशेष! गणपतीच्या दिवसात वाढली जाणारी ‘बाहेरची’, गायींची पानं असो वा उंदरकीच्या निमित्ताने उंदराला शेतावर नेऊन दिलेलं नव्या तांदळाच्या खिरीचं पान असो, ज्यांचे त्यांचे घास त्यांच्या-त्यांच्या मुखी पडल्याशिवाय कोकणी माणूस पानावर बसणार नाही. सणात होणार्या पक्वान्नाच्या जेवणानंतर दारच्या मांडवावरच्या काकड्या नि चिबुड यांची मुखशुद्धी कोकणी माणसाला रोजचीच असली तरी चाकरमान्यांसाठी पर्वणी असते.
गणपतीची आरती हा आमच्याकडच्या उत्सवाचा खर्या अर्थानं ‘यूएसपी’ असतो. अख्ख्या वाडीतली, आवाठातली पोरंटोरं, म्हातारीकोतारी, तरुणप्रौढ़ मंडळी गोळा होत तिनसानचीच ( तिन्हीसांजेला) आरतीला सुरुवात करतात. पेटी ( त्यातही काही ठिकाणी खास पायपेटी बरं का), नाल, झांज, टाळाच्या गजराच्यावर आरत्यांचा गजर झाला की, त्या आरत्या गणपतीला ‘पावल्या’ असं आम्ही मानतो. संध्याकाळपासून सुरू झालेल्या या आरत्या या घराकडून त्या घराकडे असं करत गाव घेत रात्री उशिरापर्यंत चालतात. एखायाचा नाजूक, कोमल आवाज गायनाच्या मैफिली सजवत असेलही कदाचित, पण इथे ज्याचा आवाज ‘खडा’ त्याच्याकडे आरतीचं नेतृत्व सोपवलं जातं. एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या जन्मजात कोकणी चढाओढीनं तरीही अतिशय भक्तीभावाने एकावर एक आरत्या दणदणीत खड्या आवाजात गायल्या जातात. प्रशासनाच्या व्हॉल्युम कंट्रोलसाठीच्या डेसिबल्स- फेसिबल्सच्या लिमिटची पर्वा इथं कुणीही करत नाही.
कोकणी माणसाच्या वागण्या-बोलण्यातून नेहमी जाणवतो तो इथल्या मातीचा रांगडेपणा! कारण आमचं जगणंच मातीतलं असतं, तिच्या रांगडेपणाशी साधर्म्य साधणारं! त्याच्या जोरावरच आम्ही उभ्या जगाशी टक्कर घेतो आणि एकमेकांवर दावेसुद्धा ठोकतो. कोकणी माणूस म्हणजे तिरकस, इरसाल, वात्रट, खोडकर आणि टिपिकल ‘कोकण्या’ समजला जातो. पण वरून टणक असणारा हा माणूस मऊ होतो तो बाप्पांच्या विसर्जनाच्या आरतीला!
इतके दिवस घरच्यासारखा ‘पावणेर’ करून तळहातावर जपलेल्या बाप्पाला निरोप देताना त्याच्याही डोळ्यांच्या कडा पाणावतात. म्हणूनच, गणपती विसर्जन केल्यावर नदीपात्रातले खड़े उचलून आणून त्यांच्यासमोर त्या रात्री आरत्या करण्याची पद्धत फक्त कोकणात असावी. कोकणी माणूस आहेच तसा... आतून शहाळ्यासारखा मऊ!