

भाईंदर : राज्य उत्सव असलेल्या गणेशोत्सवात ध्वनी प्रदूषण नियम, 2000 आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुषंगाने मराठी एकीकरण समितीने यंदाच्या नवरात्रीतील गरब्यात सर्रास डीजेचा वापर केला जात असल्याचा आरोप केला आहे. गरीब्यातील या डीजे वापराच्या नियमात सामानता आणण्याची मागणी मराठी एकीकरण समितीने मिरा-भाईंदर पोलिसांकडे केली आहे.
मिरा-भाईंदर शहरात राज्यातील दोन मोठ्या उत्सवांमधील डीजे वापराबाबतच्या नियमांमध्ये विसंगती असल्याचा आरोप समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी केला आहे. राज्य शासनाने गणेशोत्सवाला राज्य उत्सव म्हणून घोषित केले आहे. या उत्सवादरम्यान ध्वनी प्रदूषणावरील नियंत्रणासाठी डीजेच्या वापराला कठोरपणे प्रतिबंधित करण्यात येते. हा निर्णय कायद्याच्या अंमलबजावणीसाठी योग्य असला तरी शहरात सध्या साजरा होणार्या नवरात्रीतील गरबा-दांडिया या उत्सवात मात्र डीजेचा वापर सर्रास केला जात असल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे.
शहरात डीजेचा मोठ्याप्रमाणावर वापर केला जात असून त्याला काही प्रमाणात परवानगी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. विशेषतः जेव्हा एक उत्सव राज्य उत्सव म्हणून घोषित केला गेला असतानाही, दुसर्या उत्सवातील नियमांमध्ये शिथिलता दिसून येत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
गणेशोत्सव व गरबा दोन्ही उत्सवांमध्ये ध्वनी प्रदूषणाची समस्या समान असून या ध्वनी प्रदूषणाचा नागरीकांना त्रास होतो. यामुळे ध्वनी प्रदूषण कायद्याची प्रभावी आणि समान अंमलबजावणी करण्यासाठी गणेशोत्सव आणि गरबा या दोन्ही उत्सवांमध्ये डीजेच्या वापराबाबत सुसंगत आणि पारदर्शक धोरण तयार करण्यात यावे, अशी मागणी समितीकडून करण्यात आली आहे.
...तर समस्या नियंत्रणात येईल
कायद्याची योग्य अंमलबजावणी झाल्यास नागरीकांमध्ये पोलीस व राज्य शासनावरील विश्वास वाढेल आणि ध्वनीप्रदूषणाची समस्या प्रभावीपणे नियंत्रणात येईल, असा दावा समितीने केला आहे. याबाबतचे निवेदन समितीने पोलिसांना दिले असून त्यात दोन्ही उत्सवांतील डीजे वापराबाबत समानता आणण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे.