

भिवंडी : भिवंडी शहरात एकात्मतेचा राजा म्हणून गौरविल्या जाणार्या धामणकर नाका मित्र मंडळ व स्वाभिमान सेवा संस्थे तर्फे 37 व्या सार्वजनिक गणेशोत्सवात भव्यदिव्य सजावटी सह अनेक सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून साजरा केला जाणार असून गणेशोत्सव दरम्यान आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदान करणार्या नागरिकांचा दहा लाख रुपयांचा अपघात विमा देऊन रक्तदात्यांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती संस्थाध्यक्ष संतोष शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी मंडळाचे सरचिटणीस मोहन बल्लेवार, प्रवक्ता संजय भोईर, पदाधिकारी राजेश पटवारी, ईश्वर पामु, राम बुरा, महेश खापरे आदी उपस्थित होते.
शहरात भव्यदिव्य सजावट उभारून राष्ट्रीय एकता जपणारा गणेश उत्सव साजरा केला जात असल्याने अनेक वर्ष पोलिस आयुक्तालया कडून प्रथम पारितोषिक पटकावत असतानाच मागील दोन वर्षे शासन स्तरावरील स्पर्धेत जिल्हास्तरावर या गणेशोत्सवाचा गौरव झाला आहे. यंदा गणेशोत्सवात भिवंडीकर भक्तांना उत्तरप्रदेश राज्यातील मथुरा, वृंदावन येथील उभारले जात असलेल्या वृंदावन चंद्रोदय मंदीर (इस्कॉन) या मंदिराची 130 फूट उंचीची प्रतिकृती पर्यावरण पुरक साहित्यांचा वापर करून केली जात आहे. त्यासाठी लाकडी बांबू, वासे, रंगीत कपडा याचा अधिकाधिक वापर केला गेला आहे. गणेशोत्सव दर्शनाचा शुभारंभ प्रतिवर्षाप्रमाणे खडवली येथील मातोश्री वृद्धाश्रमातील वृद्धांना देऊन केला जाणार आहे. आत पर्यंत संस्थेच्या माध्यमातून मातोश्री वृद्धाश्रमास साडे तीन लाखांची विविध स्वरूपात मदत करण्यात आली आहे.
कोविड काळापासून गणेशोत्सवात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असून यंदाच्या सहाव्या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांचा 10 लाखांचा अपघात विमा देऊन सन्मान केला जाणार आहे. तर नेत्र चिकित्सा शिबिरात मोफत चष्मे व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया संस्थेच्या माध्यमातून केल्या जाणार आहेत.
संस्थेच्या वतीने 22 वर्षा पासून शहरातील इतर गणेशोत्सव मंडळांना समाज प्रबोधन सजावट देखावे उभारण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या हेतूने स्वाभिमान श्री गणेश दर्शन स्पर्धा ही रोख पारितोषिक असलेल्या स्पर्धेचे आयोजन भिवंडी शहराकरीता केले जात आहे. तर दोन वर्षांपासून भिवंडी पूर्व विधानसभा क्षेत्रासाठी घरगुती स्वाभिमान श्री गणेश दर्शन स्पर्धा भरविली जाणार आहे.