

ठाणे : प्रवीण सोनावणे
हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून काही दिवसांपूर्वी राजकीय वातावरण तापले होते. हा मुद्दा थंड होत नाही तोच आता नूतनीकरण करण्यात आलेल्या ठाणे महापालिकेच्या गडकरी रंगायतन नाट्यगृहातील प्रेक्षागृहाच्या बाहेर पडण्याच्या दरवाज्यावर लावण्यात आलेल्या हिंदी शब्दावरून नवा वाद होण्याची चिन्हे आहेत. बाहेर पडण्याच्या दरवाजावर ‘निकास’ या हिंदी शब्दाचा प्रयोग करण्यात आला आहे. ठाणे महापालिकेलाच मराठी भाषेविषयी वावडे आहे की काय? असा प्रश्न आता यानिमित्ताने समोर आला आहे.
नूतनीकरणासाठी तब्बल 10 महिने बंद असलेल्या राम गणेश गडकरी रंगायतनचा पडदा आज स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर उघडणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या नूतनीकरण झालेल्या नाट्यगृहाचे उद्घाटन होणार आहे. गडकरी रंगायतनला मराठी रंगभूमीची मोठी परंपरा आहे. मराठी नाटकांचे शेकडो प्रयोग या ठिकाणी गाजले असून मराठी नाट्य परंपरेतील दिग्गज कलाकारांनी या ठिकाणी हजेरी लावली आहे. मात्र प्रेक्षागृहाच्या बाहेर पाडण्यासाठी लावण्यात आलेल्या दरवाजावर थेट ‘निकास’ या हिंदी शब्दाचा प्रयोग केल्याने ठाणे महापालिकेने नवा वाद ओढवून घेतला आहे.
नूतनीकरण झालेल्या नाट्यगृहाला बाहेर पडण्यासाठी सहा दरवाजे बसवण्यात आले आहेत. नूतनीकरणापूर्वी या दरवाज्यांवर ‘बाहेर’ असा मराठी शब्द तर ‘एक्झिट’ हा इंग्रजी शब्दप्रयोग वापरण्यात आला होता. मात्र आता या ठिकाणी बाहेर पाडण्यासाठी ‘निकास’ या हिंदी शब्दाचा प्रयोग करण्यात आल्याने सर्वसामान्य प्रेक्षकांना तरी हा शब्द समजेल का? असा प्रश्न साहित्यिकांकडून उपस्थित करण्यात आला आहे.
‘निकास’ हा शब्द प्रामुख्याने बँकेत किंवा विमानतळ अशा ठिकाणी वापरला जात असून नाट्यगृहात मात्र मराठीच साधा सोपा शब्द वापरणे उचित होईल असे भाषा अभ्यासकांचे म्हणणे आहे. हिंदी शब्दाचा प्रयोग करताना एकाही पालिका अधिकार्याच्या हे लक्षात कसे आले नाही, याबाबत मात्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
पालिका आयुक्तांनी केली पाहणी...
आज होणार्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त सौरभ राव यांनी गुरुवारी गडकरी रंगायतन नाट्यगृहाची पाहणी केली. नूतनीकरणानंतर अद्ययावत असे नाट्यगृह झाले असून यामध्ये अधिक सुविधा वाढवण्यात आल्या असल्याचे आयुक्तांनी सांगितले. याशिवाय लवकरच घाणेकर नाट्यगृहाचे देखील नूतनीकरण होणार असून तिसर्या नाट्यगृहासाठी पालिका प्रयत्नशील असल्याचे पालिका आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले.
‘निकास’ हा हिंदी शब्द वापरून पालिकेने अकलेचे तारे तोडले आहेत. मुळात हा संस्कृत शब्द असून एवढा कठीण शब्द वापरण्याची आवश्यकता काय आहे? प्रेक्षकांना समजेल असा साधा सोपा मराठी शब्द का वापरला गेला नाही याबाबत आश्चर्य वाटते. हा हिंदी शब्द काढून साधा सोपा मराठी शब्द त्या ठिकाणी वापरला पाहिजे.
प्रा. अशोक बागवे, ज्येष्ठ कवी, साहित्यिक
निकास या शब्दाचा अर्थ बाहेर जाण्याची क्रिया असा आहे. हा मूळ संस्कृत शब्द असून तो हिंदीमध्ये आयात करण्यात आला आहे. हा शब्द प्रामुख्याने हिंदीमध्येच वापरला जातो.
प्रा. अनिल ढवळे