दहावीचा निकाल मे महिन्यात लागला असला तरी राज्यात सर्वत्र लागू झालेल्या ऑनलाईन किचकट प्रवेश प्रक्रियेमुळे 11वीचे वर्ग सुरू होण्यास तब्बल चार महिने लागणार आहेत. ऑनलाईन प्रक्रियेमध्ये चार टप्पे ठेवत प्रक्रिया राबवली गेली, मात्र आजही जवळपास 7 लाख विद्यार्थी प्रवेशाविनाच आहेत.
राज्यात पहिल्यांदाच अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात असल्याने अनेक तांत्रिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे सरकारकडून फक्त दोनच प्रवेशाच्या फेर्या घोषित झाल्याने उर्वरित 6 लाख 99 हजार 147 विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. परिणामी यंदा राज्यातील अकरावीचे वर्ग सुरूच झाले नसून त्यासाठी ऑगस्टच्या अंतिम आठवड्याची प्रतीक्षा करावी लागू शकते.
शिक्षण विभागातर्फे अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीभूत पद्धतीने राबविली जात आहे. शहरी भागाबरोबर ग्रामीण, आदिवासी, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना एकाच वेळी शिक्षण विभागाकडून घोषित होणार्या यादीनुसार प्रवेश दिला जाणार आहे. त्यात शिक्षण विभागाला अनेक तांत्रिक अडचणींना तोड द्यावे लागल्याने प्रवेशाच्या पहिल्या फेरीलाच विलंब झाला. हा विलंब पुढे कायम राहिल्याने आतापर्यंत फक्त प्रवेशाच्या दोनच फेर्या जाहीर होऊन 7 लाख 20 हजार 666 प्रवेश झालेले आहेत. तिसर्या फेरीची प्रतीक्षा विद्यार्थ्यांना लागली आहे.
राज्यातील 9 हजार 483 कनिष्ठ महाविद्यालयांची एकूण प्रवेश क्षमता 2 1 लाख 37 हजार 550 इतकी आहे. तर यंदा राज्यातील 14 लाख 55 हजार 433 विद्यार्थी दहावी उत्तीर्ण झाले आहेत. त्यापैकी 14 लाख 19 हजार 813 विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केलेली आहे. प्रवेशाच्या पहिल्या फेरीअखेर 5 लाख 7 हजार 288 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला.
दुसर्या फेरीतील कॅप आणि कोटा प्रवेशांतर्गत 2 लाख 51 हजार 804 विद्यार्थ्यांची यादी घोषित होऊन त्यांना कॉलेज देण्यात आलेले आहेत. त्यापैकी 2 लाख 15 हजार 157 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. दुसर्या फेरीमध्ये मुंबई 55 हजार 965, कोल्हापूर 17 हजार 315, पुणे 36 हजार 421, अमरावती 20 हजार 117, छत्रपती संभाजीनगर 27 हजार 957, लातूर 13 हजार 738, नागपूर 21 हजार 518 आणि नाशिक 22 हजार 126 असे एकूण 2 लाख 15 हजार 157 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे.
अकरावीच्या तिसर्या नियमित फेरी करिता प्रवेश अर्जाचा भाग दोन भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. दोन दिवसात तिसरी यादी प्रसिद्ध होईल आणि 28 जुलैपर्यंत प्रवेश निश्चित होतील. त्यानंतर चौथ्या यादीच्या प्रवेशाला आणखी दहा दिवस लागतील. पाचवी आणि विशेष प्रवेश याद्याही लागेल. त्यामुळे यंदा अकरावीचे वर्ग सुरु होण्यास किमान तीन आठवड्यांचा विलंब होणार आहे.
ऑनलाईन प्रवेशाचा मोठा फटका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसला आहे. ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना खासगी क्लासेसच्या तितक्याशा सुविधा उपलब्ध नसल्याने उशिरा सुरू होणार्या अकरावीच्या वर्गामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होताना दिसून येत आहे. तर शहरी भागामध्येही उशिरा सुरू होणार्या अकरावीच्या वर्गांमुळे विद्यार्थ्यांनी महाविद्यालय सुरू होण्याआधीच महागडे क्लासेस जॉईन केल्याची स्थिती आहे.
ग्रामीण भागात जातनिहाय, प्रवर्ग निहाय जागा असल्याने त्या जागांसाठी विद्यार्थी मिळत नसल्याने जागा शिल्लक राहण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे, त्यामुळे यंत्रणेत गोंधळ निर्माण होत असल्याचे प्रकारही मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत.