

डॉ. महेश केळुसकर
ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि तेव्हापासून भारतीय स्वातंत्र्याचा कायदा लागू झाला. देश सार्वभौम झाला. हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हजारो भारतीयांनी स्वातंत्र्य लढा दिला, हालअपेष्टा सोसल्या, त्याग केला. 26 जानेवारी 1950 पासून भारतीय प्रजासत्ताक सुरू झालं. रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं ‘जनगणमन’ हे भारताचं राष्ट्रगीत झालं आणि बंकीमचंद्रांनी लिहिलेलं ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रीय गीत झालं.
तथापि आजच्या काळात असं दिसून येतं की, मानवी समाज व्यवस्थेत विषम तत्त्वांची मांडणी करणार्या सर्वच यंत्रणांनी जगभरातल्या माणसांचा संकोच केलेला आहे. त्यामुळे माणसांचे समूह वेगवेगळ्या गटात बंदिस्त झालेले आहेत. त्या त्या गटाची समूह जाणीव त्यांच्याच वर्तुळात सीमित आणि जखडबंद झालेली आहे. जात किंवा वर्गाच्या पातळीवर, धर्म किंवा पंथाच्या पातळीवर, त्या त्या जाती-वर्ग- धर्म-पंथ यांच्या स्व वर्तुळातील संवेदना जगू लागली आहे. त्या वर्तुळाच्या बाहेर जे जग किंवा समूह होते, त्यांच्याशी जाणिवेच्या पातळीवर या बंदिस्त वर्तुळातील जगाचं काहीही नातं उरलेलं नाही.
स्वतःची जात, स्वतःच्या वर्गहिताची भावना यातूनच दृढमूल होत गेलेली आहे. स्वाभाविकच इतरांच्या सुख-दुःखाशी, संवेदनांशी त्यांचा संबंध राहिलेला नाही. अशा प्रकारे स्वातंत्र्याची संवेदना बधीर होणे ही चिंताजनक गोष्ट आहे. आपलं हित ते इतरांचं अहित किंवा आपलं पोषण ते इतरांचं शोषण हे तत्त्व त्यातूनच विषमता मूलक व्यवस्थांच्या पोटी जन्माला आलं. त्यामुळे आपल्याबरोबर इतरांच्या स्वातंत्र्य भावनेचं स्थान त्यांनी अमान्य केलं. स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांचा बळी देण्याचं कारस्थान त्यातून सुरू झालं.
स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजून घेण्यासाठी मानवी समूहातील समता, बंधूचा न्याय या मूल्यांना उठाव देणारी स्वातंत्र्य विकासाची वृत्ती जाणून घेतली पाहिजे. या मूल्यांना धूळ चारणारी स्वातंत्र्य संकुचाची वृत्ती ....अभिरुण स्वातंत्र्य या संकल्पनेचे व्यापकत्व समजून घेतले पाहिजे. त्यातूनच समता दृष्टीत समाज रचनेसाठी आवश्यक असलेली समत्व भावनेची व न्यायशिलतेची संवेदना संस्कारित होणार आहे.
स्वातंत्र्य भावनेच्या संकोचातून पुढे समता, बंधुता, न्याय या मूल्यांचा बळी दिला जातो. मानवी मनाच्या जाणिवेत, नेणिवेत विषमतेची पाळमुळं घट्ट रुजवण्यासाठी तसं जाणीवपूर्वक सांस्कृतिक पर्यावरण तयार केलं जातं. अर्थातच हे सांस्कृतिक पर्यावरण विषमतावादी असतं. याच्या निर्मितीत सर्व प्रकारच्या कला, साहित्य, शास्त्र यांनी जर योगदान दिलं तर एक विषमता मूलक समाज व्यवस्था हळूहळू तयार होत जाते. म्हणूनच फुले-आंबेडकरांनी धर्मचिकित्सेप्रमाणेच साहित्यादी कला शास्त्र प्रकारांची चिकित्साही होणं महत्त्वाचं मानलं होतं. या चिकित्सेतूनच समतावादी साहित्याच्या निर्मितीचे प्रयोजन त्यांनी स्पष्ट करून सांगितलेलं आहे.
हे प्रयोजन व्यापक लोकहिताला गृहीत धरणारं आहे. म्हणून नव्या पर्यावरणात जगभरातल्या दुःखी माणसांचा विचार करताना त्यांच्या दुःख मुक्तीसाठी व जीवनाच्या न्यायशिलतेसाठी समर्पण भावाच्या न्यायानं संस्कारित संवेदना पुन्हा पुन्हा उजळत राहणं महत्त्वाचं आहे.
जे आत्मकेंद्री आणि स्व वर्तुळातील गतानुगतिक निष्ठेच्या जीवनदृष्टीला अव्हेरून इतरांच्या संवेदनांशी जुळत व्यापक व विस्तृत होत गेलेलं असतं तेच खरं स्वातंत्र्य असतं. या अर्थानं स्वातंत्र्य या तत्त्वाकडे पाहिल्यास इतरांपासून आपण वेगळे आहोत, ही तुटलेपणाची भावना आपल्या मनात निर्माण न होता आत्मकेंद्री जीवनदृष्टीच्या पलीकडे सर्व मनुष्यसृष्टीशी आपलं नातं प्रस्थापित होतं.
हेच नातं समता, बंधुता , न्याय या मूल्यांना आपल्या जीवनदृष्टीत संक्रमित करतं. म्हणून इतरांशी जुळून जाण्याच्या प्रक्रियेत स्वातंत्र्याची खरी अनुभूती असल्यामुळे शोषक-शोषित या संघर्षात आपण सर्व स्तरावरच्या शोषितांच्या बाजूनं जुळून जाणं आणि या संघर्षाचा लोकलढा एका समता दृष्टी समाज रचनेच्या बांधणीसाठी सिद्ध करणं हे लोकशाहीवादी जाणिवेच्या साहित्याचं प्रयोजन असतं.
या प्रक्रियेत वंश,जात, वर्ग,अथवा आपलं स्वतःचं हित यांच्यावरील पारंपरिक निष्ठा नसते. या प्रक्रियेतील स्वातंत्र्यासंबंधीची अशी जाण ज्या व्यक्तीमनात निर्माण होते, त्याला सर्व प्रकारच्या निर्बंधातून मुक्तता अनुभवता येते आणि समतेचं नवं सांस्कृतिक पर्यावरण उभं करता येतं.
लोकशाही आणि स्वातंत्र्यनिष्ठ विचारधारेच्या साहित्याला मानवी मनातील स्वातंत्र्याच्या अनुभूतीची प्रक्रिया गतिमान करावी लागणार आहे. मानवी समाज व्यवहारात समतेची मांडणी करणार्या आणि मनुष्य-मनुष्यातील संवादाची अपेक्षा करणार्या फुले, आंबेडकर यांच्यासारख्या लोकशाही विचारधारेतून निर्माण झालेल्या साहित्य व्यवहाराचं सौंदर्यत्व टिकवून ठेवलं पाहिजे आणि म्हणूनच विवेक आणि करुणा यांना आपल्या जीवनदृष्टी आणि विचारसृष्टीत महत्त्वाचं स्थान असायला हवं.
स्वातंत्र्याचा संकोच करून निर्माण झालेली विषमता मुळासकट घालवायची असेल तर विश्वस्तरावरील स्वातंत्र्य संकल्पनेचा आकृतीबंध आधी निर्माण केला पाहिजे. त्यातूनच समताधिष्ठित समाज रचनेची नवी मूल्ये रुजवता येतील. खर्या अर्थाने स्वातंत्र्यदिन साजरा करता येईल.
जे आत्मकेंद्री आणि स्व वर्तुळातील गतानुगतिक निष्ठेच्या जीवनदृष्टीला अव्हेरून इतरांच्या संवेदनांशी जुळत व्यापक व विस्तृत होत गेलेलं असतं तेच खरं स्वातंत्र्य असतं. या अर्थानं स्वातंत्र्य या तत्त्वाकडे पाहिल्यास इतरांपासून आपण वेगळे आहोत, ही तुटलेपणाची भावना आपल्या मनात निर्माण न होता आत्मकेंद्री जीवनदृष्टीच्या पलीकडे सर्व मनुष्यसृष्टीशी आपलं नातं प्रस्थापित होतं.