

कोपरखैरणे/ मुंबई : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर पाच वृद्ध रुग्णांना दृष्टि गमवावी लागल्याचे तपासात उघड झाल्यानंतर नवी मुंबईतील नेत्ररोगतज्ज्ञ पिता आणि पुत्रावर वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ. डी. व्ही. पंडित आणि त्यांचा मुलगा डॉ. चंदन पंडित अशी गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरांची नावे असून त्यांचे वाशी सेक्टर 10 येथे ‘पंडित आय सर्जरी अॅण्ड लेझर हॉस्पिटल’ हे डोळ्यांचे रुग्णालय आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोतीबिंदू असलेल्या 67 वर्षीय व्यक्तीवर मार्चमध्ये या रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली. नेत्ररोगतज्ज्ञ असलेल्या वडील व मुलाने ही शस्त्रक्रिया केली. मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर डोळ्यांना संसर्ग झाला. त्यामुळे त्यांची दृष्टी गेली, असे तक्रारदाराने म्हटले आहे. त्यांच्याशिवाय त्याच रुग्णालयात डिसेंबर 2024 पासून शस्त्रक्रिया केलेल्या इतर चार जणांचीही दृष्टि गेल्याचा आरोप संबंधितांनी केला आहे.
जिल्हा शल्यचिकित्सकांनी तक्रारदाराच्या आरोपांमध्ये तथ्य आढळल्याचा अहवाल अलीकडेच वाशी पोलिसांना दिला. या अहवालाच्या आधारे, वाशी पोलिसांनी 87 वर्षीय ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ आणि त्यांच्या मुलाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 125(अ), 125(ब) (इतरांच्या जीवाला किंवा वैयक्तिक सुरक्षिततेला धोका निर्माण करणारे कृत्य) आणि 3(5) (सामान्य हेतू) तसेच राष्ट्रीय वैद्यकीय आयोग कायद्याच्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोपरखैरणे सेक्टर 14 येथील रहिवासी राजेंद्र गुप्ता यांनी या प्रकरणात सर्वप्रथम तक्रार केली होती. इतर तक्रारदारांमध्ये किसन धनावडे, लक्ष्मी धनावडे (पती-पत्नी), संजीव गुप्ता आणि अंजनी सावंत यांचाही समावेश आहे. या सर्वांनी संबंधित रुग्णालयातच डोळ्याची शस्त्रक्रिया करवून घेतली होती. याबाबत रुग्णालय प्रशासनाकडून प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
निष्काळजीपणाचा ठपका
दोन्ही डॉक्टरांवर अविचारीपणे, घाईघाईने आणि निष्काळजीपणाने शस्त्रक्रिया केल्याचा आरोप आहे. परिणामी, 65 वर्षांवरील जोडप्यासह पाच रुग्णांच्या डोळ्यांना गंभीर दुखापत झाली. शस्त्रक्रियेनंतर पीडितांना स्यूडोमोनास विषाणूमुळे गंभीर संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे, असे अहवालात म्हटले आहे.
परवाने नूतनीकरण नाही
शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर 87 वर्षांचे आहेत. या वयात डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्याची परवानगी आहे की नाही, ते आम्ही तपासत आहोत, असे वाशी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय धुमाळ यांनी सांगितले. दरम्यान, दोन्ही डॉक्टरांनी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे त्यांचे परवाने नुतनीकरण केलेले नसल्याचेही पोलिसांना आढळून आल्याचे धुमाळ यांनी पुढे म्हटले.