

डोंबिवली : पावसाळा सुरू झाल्यानंतर कल्याणमध्ये डेंग्यूच्या आजाराने पहिला बळी घेतला आहे. विलास भगवान म्हात्रे (31) असे मृत रूग्णाचे नाव आहे. बेतुरकरपाड्यात राहणार्या या तरूणावर सुरूवातीला त्याच्यावर केडीएमसीच्या रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर खासगी रूग्णालयात उपचार सुरू असतानाच या तरूणाचा मृत्यू झाला आहे. मात्र या घटनेनंतर कल्याण-डोंबिवलीकरांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे.
पावसाळ्याच्या सुरूवातीलाच कल्याण-डोंबिवलीमध्ये ताप, सर्दी आणि खोकल्याच्या रूग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसते. त्यात डेंग्यूनेही डोके वर काढले आहे. गेल्या दोन महिन्यांत कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीत डेंग्यूचे 35 रुग्ण आढळले आहेत. तर रूग्णालयात उपचार सुरू असताना एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
पावसाळ्यात कल्याण-डोंबिवलीमध्ये साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. मेपासून आतापर्यंत डेंग्यूचे 30 हून अधिक रुग्ण कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात आढळून आले आहेत. कल्याण पश्चिमेतील बेतूरकर पाड्यात राहणार्या विलास भगवान म्हात्रे या 31 वर्षीय तरुणाला डेंग्यूची लागण झाल्याचे निदान झाले होते. 7 जुलै रोजी त्याला कल्याणमधील केडीएमसीच्या रूक्मिणीबाई रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती खालावल्याने त्याला मुंबईच्या सायन येथील लोकमान्य टिळक रूग्णालयात नेण्याच्या सूचना केडीएमसी रूग्णालयाकडून दिली होती. मात्र विलासच्या कुटुंबीयांनी त्याला कल्याण पूर्वेकडील एका खासगी रूग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान प्रकृती खालावल्याने गुरूवारी सकाळी विलास म्हात्रे याचा मृत्यू झाला. या संदर्भात केडीएमसीच्या वैद्यकिय आरोग्य विभागाने देखील दुजोरा दिला आहे.
या संदर्भात अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी सांगितले की, डेंग्यूचे निदान झाल्याचे समजताच विलास राहत असलेल्या परिसरात सर्वेक्षण करत धूर फवारणीसह आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. पावसाळ्यात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होतो. डेंग्यूचा डास स्वच्छ पाण्यावर अंडी घालतो. नागरिकांनी सात दिवसांतून एकदा साठवलेले पाणी ओतून भांडी स्वच्छ करावी. 25 मे पासून तब्बल दीड लाख घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. 300 ठिकाणी डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत. तेथे औषध फवारणी करण्यात आली आहे.
डेंग्यू संदर्भात संबंधित परिसरात जनजागृतीसह आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे डेव्हलपर्स आणि सोसायत्यांना देखील नोटिसा देण्यात आल्या आहेत. सोसायटीच्या सोशल मीडिया ग्रुपवरही डेंग्यू, मलेरिया संदर्भात जनजागृती व घ्यावयाची काळजी यासंदर्भात जनजागृती करण्यात आली आहे. नागरिकांनी डेंग्यू किंवा मलेरियासदृश्य लक्षणे आढळल्यास तात्काळ केडीएमसीच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल व्हावे, असे आवाहन देखील अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी या पार्श्वभूमीवर बोलताना केले.
साथीच्या रुग्णांवर औषधोपचार करण्याकरिता डोंबिवलीतील शास्त्रीनगर रूग्णालय व कल्याणातील बाई रूक्मिणीबाई रुग्णालय, तसेच 4 दवाखाने आणि 26 नागरी आरोग्य केंद्रांतील ओपीडी, आरोग्यवर्धिनी केंद्रे, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, आपला दवाखाना येथील ओपीडीमध्ये येणार्या रुग्णांवर उपचार करण्यात येतात.
प्रभागांत गटचर्चा तथा सभा अयोजित करुन डेंग्यू प्रतिबंधक कार्यवाहीची नागरिकांना माहिती देणे. यासाठी स्वयंसेवी संस्था, प्रभागक्षेत्र अधिकारी तसेच आवश्यकतेनुसार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग घेणे. नागरिकांना डेंग्यू व हिवतापाबाबत आरोग्य शिक्षण देणे. हस्तपत्रके वाटप करणे पोस्टर्स, बॅनर यांच्या माध्यमातून जनजागृती करणे. पावसाळ्यात पाणी साचून डासांच्या उत्पत्तीत वाढ होवून हिवतापाची साथ पसरण्याची शक्यता असते. डासांची अंडी ही साचून राहणार्या स्वच्छ पाण्यामध्ये वाढतात. त्यामुळे आठवड्यातून कोणताही एक दिवस घरातील वापरण्या योग्य पाण्याची भांडी धुवून-पुसून कोरडी करावी आणि कोरडा दिवस पाळावा, असे आवाहन वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ल यांनी केले आहे.